जालना : नवीन घर घेण्यासाठी माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत २२ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून घनसावंगी पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा कलीम कुरेशी (वय २२, रा. परतूर, सध्या रा. पारडगाव, ता. घनसावंगी) असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीमा यांचा विवाह २६ मे २०२२ रोजी मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे परतूर येथील कलीम सलीम कुरेशी याच्याशी झाला होता. दांपत्याला तीन वर्षांची मुलगी (मायनूर) आहे. लग्नानंतर पहिली तीन वर्षे सासरच्यांनी चांगले वागवले. मात्र, त्यानंतर "तुला काम नीट करता येत नाही, आम्हाला आमच्या मुलाचे दुसरे लग्न करायचे आहे," असे म्हणत सासरच्या मंडळींनी सीमा यांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली.
चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण
पती कलीम याने सीमा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सासू, सासरे, दीर व नणंद यांनीही चिथावणी देऊन मारहाण केली. "आपल्याला नवीन घर घ्यायचे आहे, तू तुझ्या आई-वडिलांकडून १ लाख रुपये घेऊन ये," असा तगादा पतीने लावला. यावर "माझे आई-वडील गरीब असून त्यांच्याकडे पैसे नाहीत," असे सीमा यांनी सांगताच पतीने शिवीगाळ करत मारहाण केली. अखेर त्यांनी घनसावंगी पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली व तक्रार नोंदवली. पतीसह सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाच महिन्यांपासून विवाहितेचा माहेरी आश्रय
सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळलेल्या सीमा यांना पाच महिन्यांपूर्वी सासरच्या मंडळींनी घरातून हाकलून दिले. तब्येतीची तडजोड करत आणि छळाला कंटाळून त्या पारडगाव (ता. घनसावंगी) येथील माहेरी आई-वडिलांकडे राहत होत्या.