फोडणीची चव महागली, लसूण-अद्रकाचे दर तेजीत pudhari photo
जालना

Jalna garlic ginger price : फोडणीची चव महागली, लसूण-अद्रकाचे दर तेजीत

लसणाला १५ हजार ७०० तर अद्रकाला १२ हजारांचा भाव

पुढारी वृत्तसेवा

जालना : सर्वसामान्यांच्या फोडणीची चव महागली असून, जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण आणि अद्रकाचे भाव भडकले आहेत. लसणाला १५,७०० तर अद्रकाला १२,००० रुपये प्रतिक्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला असून, भाजीपाला मार्केटमध्ये आवक आणि भावातील या चढ-उतारामुळे तेजीचे वातावरण आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत (नवीन मोंढा) भाजीपाला व फळांची मोठी आवक झाली असून, लसूण आणि अद्रकाचे (आले) दर कमालीचे तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी (२५ ऑगस्ट) बाजारात लसणाला प्रतिक्विंटल कमाल १५ हजार ७०० रुपये, तर अद्रकाला १२ हजार रुपये भाव मिळाला.

दुसरीकडे, फळबाजारात सफरचंद आणि डाळिंबाची आवक जोरात सुरू आहे. लसूण व अद्रकात तेजी: लसणाची २४.५ क्विंटल आवक झाली असून, त्यास किमान ३,२०० रु., सरासरी ८,८०० रु. तर कमाल १५,७०० रुपये भाव मिळाला. अद्रकाची १९.७५ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ७,५०० रु. तर कमाल १२,००० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. कांदा व बटाटा बाजाराची स्थिती: कांद्याची १०३.२ क्विंटल आवक झाली असून, त्यास सरासरी २,५०० रु. तर कमाल ४,६०० रुपये भाव मिळाला. बटाट्याची १३८.९ क्विंटल आवक झाली असून, त्यास सरासरी ७५० रु. तर कमाल १,३०० रुपये दर मिळाला.

पालेभाज्यांचे दर (प्रति जुडी)

कोथिंबिरीची २,५७६ जुडी आवक झाली असून, ती ५० ते १५० रुपया दरम्यान विकली गेली. मेथीची २,१७६ जुडी आवक होऊन ती १०० ते ३०० रुपयांपर्यंत विकली गेली. तसेच पुदिन्याला कमाल ४०० रुपये जुडीचा भाव मिळाला. इतर भाजीपाला (प्रति क्विंटल): भुईमूग शेगा ५,३०० रु., शेवगा ३,५०० रु., गवार ३,००० रु., कारले २,५०० रु., टोमॅटो १,००० रु., तर हिरवी मिरची २,००० रुपये कमाल दराने विकली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT