Jalna Free, fair, and transparent municipal elections
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेची निवडणुक मुक्त, निष्पक्ष, शांततेत व पारदर्शक पद्धतीने यशस्वी पार पाडल्याबद्दल जालना फर्स्ट नागरिक मंचच्या वतीने जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांच्यासह जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन करत आभार व्यक्त करण्यात आले.
जालना फर्स्ट नागरिक मंचातर्फे जिल्हाधिकारी मित्तल यांना दिलेल्या गौरव पत्रात म्हंटले आहे की, आपल्या सक्षम नेतृत्वाखाली जालना शहर महानगरपालिकेसाठी प्रथमच झालेली निवडणूक अत्यंत नियोजन, शिस्तबद्ध व विश्वासार्ह पद्धतीने पार पडली. प्रशासनाने दाखवलेली काटेकोर नियोजन क्षमता, प्रभावी समन्वय आणि कार्यक्षम अंमलबजावणी ही उत्तम प्रशासनिक व लोकशाही मूल्यांची प्रचिती देणारी ठरली, असे नमूद करण्यात आले.
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी व क्षेत्रीय यंत्रणेच्या समर्पित कार्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व सर्वसमावेशक झाली असून नागरिकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा व प्रत्येक मताचा सन्मान राखला जावा, यासाठी प्रशासनाने दाखवलेली कटिबद्धता अत्यंत प्रशंसनीय आहे. अशा आदर्श निवडणूक प्रक्रियेमुळे लोकशाही मूल्यांचे संवर्धन होते तसेच नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना अधिक बळकट होते. असे नमूद करत उल्लेखनीय कार्यासाठी अभिनंदन करत पारदर्शक, सहभागी व प्रगत जालना घडविण्यासाठी आपण देत असलेल्या सातत्यपूर्ण सेवेबद्दल नागरिक मंचाने आभार मानले.