जालना : जालना जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. जिल्ह्यातील ७२५ गावे पावसामुळे बाधित झाली आहेत. ३०१ जनावरे दगावली असून ४ लाख ५१ हजार ४८३ शेतकऱ्यांच्या ३ लाख ३७हजार ३६१ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आगामी काही दिवसांत दूषित पाण्यातून विविध रोगांची लागण होण्याची भीती असल्यामुळे आरोग्य विभागावरील ताण वाढणार आहे.
जोरदार अतिवृष्टीनंतर जिल्ह्यात सर्वत्र रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुरात सापडलेल्या लोकांना अन्नधान्यासह त्यांच्या जेवणाची देखील सोय करण्यात आली आहे. केवळ माणसांनाच नाही तर शेतकऱ्यांच्या पशूधन वाचविण्यासाठीही प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.
गोदावरी नदीतून सुमारे ३ लाख क्सुसेक इतका विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील सुमारे ३८ गावे बाधित झाली आहेत. यामुळे बऱ्याचशा गावांना स्थलांतरित करण्यात आले आहे. परतूर, अंबड, घनसावंगी या तालुक्यातील सुमारे ७ हजारांहून अधिक नागरिकांना विविध गावांतून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आले असून, यातील ७ हजार ५९९ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाजमंदिरात केलेल्या निवास व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. २३ ठिकाणी अशा निवासव्यवस्था करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना भोजन आणि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनालाही सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्यांना चारा देण्यात येत आहे. जिल्ह्यात ३ लाख ३७ हजार ३६१ हेक्टरपैकी ५३ हजार ९१७ हेक्टर जमिनीवरील बाधित पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
जलजन्य व किटकजन्य आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी गाळून व उकळून प्यावे. साचलेल्या पाण्यात रॉकेल किंवा जळालेले ऑईल टाकावे, घरातील पाणी साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत.जयश्री भुसारे, जिल्हा आरोग्य अधिकारी