Jalna Farmers Fertilizer Scheme file photo
जालना

Jalna Farmers Fertilizer Scheme : खत खरेदी आता मोबाईलवर!; आजपासून ‘एफएफएस’ प्रणाली

शेतकऱ्यांनो, आता 'क्यूआर कोड' दाखवा आणि खत मिळवा, खतासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अनुदानित रासायनिक खते खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांसमोर तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची किंवा वणवण भटकण्याची गरज उरणार नाही. केंद्र शासनाच्या 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' (एफएफएस) या मोबाईल-आधारित डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी येत्या २२ ऑक्टोबर पासून जालना जिल्ह्यात सुरू होत आहे. या प्रणालीमुळे खत खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार असून शेतकऱ्यांनी आवश्यक पूर्वतयारी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सध्या कृषी सेवा केंद्रांवर ई-पॉस (e-PoS) मशीनद्वारे खतांची विक्री केली जाते. मात्र, खतांची उपलब्धता निश्चित व्हावी आणि पारदर्शकता यावी यासाठी केंद्र शासनाने 'एफएफएस' मोबाईल ॲॅप विकसित केले आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर, तर दुसऱ्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांत ही प्रणाली यशस्वी ठरली.

आता तिसऱ्या टप्प्यात २२ ऑक्टोबरपासून जालना जिल्ह्यासह उर्वरित महाराष्ट्रात ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे. जर शेतकऱ्याऐवजी अन्य व्यक्ती खत आणायला जाणार असेल, तर त्या प्रतिनिधीचे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि क्यूआर कोड सोबत असणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रणालीमुळे दुकानांमधील गर्दी आणि लांबच लांब रांगांपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. जमिनीचे क्षेत्र आणि पिकाच्या आधारे शास्त्रोक्त खत मात्रा (GFR) पाहता या माध्यमातून पाहता येणार आहे. घरबसल्या जवळच्या दुकानात खताचा साठा तपासून बुकिंग करता येईल, यामुळे काळाबाजार आणि बोगस विक्रीला आळा बसणार आहे.

असे करा खताचे बुकिंग…

गुगल प्ले स्टोअरवरून ॲप डाऊनलोड करा. राज्य निवडून फार्मर आयडी व आधार-लिंक मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून लॉगिन करा. आधार आणि मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक. गाव, जिल्हा, सर्व्हे नंबर व क्षेत्र (हेक्टर) माहिती भरून पडताळणी करा. पीक निवडल्यानंतर ॲपद्वारे जमिनीनुसार सामान्य खत शिफारस (जीएफआर) मिळेल. त्याआधारे आवश्यक खत व गोण्यांची संख्या निवडा. जवळचा खत विक्रेता (रिटेलर) निवडून अर्ज सबमिट करा. त्यानंतर ॲपवर युनिक क्यूआर कोड व टोकन नंबर प्राप्त होईल, तो मोबाईलमध्ये सेव्ह करा. दुकानात जाऊन तो 'क्यूआर कोड' दाखवून खत प्राप्त करा. बुकिंग केल्यानंतर प्राप्त झालेला क्यूआर कोड / टोकन नंबर ३ दिवसांपर्यंतच वैध राहील. या कालावधीत खत खरेदी करणे बंधनकारक आहे.

शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी तालुकास्तरावर कृषी विभागाचे अधिकारी उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या आधुनिक 'एफएफएस' डिजिटल प्रणालीचा वापर करावा. कृषी विभागातील सर्व अधिकारी व विक्रेत्यांनी व्यापक जनजागृती करून शेतकऱ्यांना सहकार्य करावे. एफएफएस ॲप डाऊनलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण ठेवावी. आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक असल्याची खात्री करावी.
पी. बी. बनसावडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि. प. जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT