जालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने घनसावंगी तालुक्यातील गुरु पिंप्री शिवारात आणि दोन प्रसिद्ध हॉटेल्सवर टाकलेल्या छाप्यात तीन वाहनांसह तब्बल ३० लाख ४८ हजार ७८० रुपयांचा अवैध आणि बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी ७ जणांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, या कारवाईमुळे अवैध मद्यविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, गुरूवार, दि. ३० रोजी अवैध मद्यवाहतुकीच्या मिळालेल्या गुप्ता माहितीद्वारे जालना ते घनसावंगी रोडवरील गुरु पिंप्री गावाकडे जाणाऱ्या पानंद रस्त्यावर पथकाने सापळा रचून छापा टाकला. यावेळी साष्ठ पिंपळगाव (ता. अंबड) येथील देशी दारू दुकानासाठी बेकायदेशीररीत्या मद्य घेऊन जाणारी महिंद्रा मॅक्स पिकअप (एमएच २१ सीएम ००८३), महिंद्रा बोलेरो (एमएच २१ व्ही ६८४५) आणि मारुती सुझुकी कार (एमच २० एफपी ७८८३) या तीन वाहनांना पथकाने रंगेहात पकडले.
या ठिकाणी उपस्थित चार जणांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता बनावट दारूच्या मोठ्या जाळ्याचा उलगडा झाला. या प्रकरणी संभाजी अंकुशराव कोल्हे (वय ४४, रा. गुरु पिंप्री), रमेश आसाराम घेरे (वय २६, रा. गुरु पिंप्री), बाळासाहेब रामकिसन घोगरे (वय २६, रा. मच्छिंद्रनाथ चिंचोली), संदिप बाबासाहेब राक्षे (वय २९, रा. धाळसखेडा, ता. अंबड), संदिप सतिश जैस्वाल (रा. अंबड), ईश्वर नारायण वाघमारे (रा. गुरु पिंप्री), सोपान भिमराव गुंजाळ (रा. गुरु पिंप्री) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस. एन. गायकवाड, एन. टी. घोगरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. गुंजाळे आणि जवान व्ही. डी. पवार, के. एस. घुणावत, वाय. एल. खरात, जी. आर. तायडे, योगेश बहुरे, पंकज साळवे, बालाजी डिघे, सोमनाथ जाधव व रामेश्वर उगले आदींनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एन. गायकवाड करत आहेत.
हॉटेलमध्ये विकली जात होती बनावट दारू
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी संभाजी अंकुशराव कोल्हे हा घनसावंगी येथील ‘हॉटेल चैतन्य बार’ मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. त्याने या बारमध्ये बनावट दारूचा साठा विक्रीसाठी ठेवल्याची तसेच तीर्थपुरी येथील 'हॉटेल इंद्रायणी बार'मध्येही बनावट दारू पुरवल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे दोन्ही हॉटेल्सवर छापे टाकले असता, तिथे प्रथमदर्शनी बनावट असलेला विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला.
अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीसंदर्भात नागरिकांना कोणतीही माहिती असल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८००-८३३-३३३३ या टोल फ्री क्रमांकावर किंवा ८४२२००११३३ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा.ज्ञानेश्वरी आहेर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना.