Jalna Water Crisis pudhari photo
जालना

Jalna Water Crisis : पावसाची दडी अन्‌‍ खोल खोल पाणी

जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील चित्र

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यात जुन महिन्याचा पहिला आठवडा संपला असतांनाच जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकही मोठा पाऊस न पडल्याने 7 मध्यम व 60 लघु प्रकल्पात केवळ 18 टक्केच पाणी साठा असल्याने परिस्थीती गंभीर बनत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा, प्रल्हादपूर, जाफ्राबाद तालुक्यातील भारज, व कोनड हे तलाव कोरडे पडले आहेत.

जिल्ह्यात 7 मध्यम व 60 लघु प्रकल्प अशा 67 प्रकल्पात जेमतेम पाणी साठा आहे. यंदा अन निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडुन वर्तविण्यात आली आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात 23.95 दलघमी (36.40 टक्के) तर 60 लघु तलावांत 26.20 दलघमी (12.47 टक्के) पाणी मिळून जिल्ह्यातील 67 तलावांमध्ये 50.15 दलघमी म्हणजे 18.17 टक्के साठा उपलब्ध आहे.

मागील वर्षीच्या अतिवृष्टीने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता काहीशी मिटली असली तरी यंदा समाधानकारक पाऊस न पडल्यास परिस्थीती बिकट होणार आहे. लघुपाटबंधारेच्यावतीने 4 जून रोजीच्या पाणीपातळी अहवालात जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा, कल्याण मध्यम, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना, भोकरदन तालुक्यातील धामना, जुई, जाफ्राबाद तालुक्यातील जिवरेखा तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात सध्या 36 टक्के पाणी आहे. 60 लघु तलावांपैकी 4 लघु तलाव कोरडाठाक पडले असून 18 तलावांची पातळी जोत्याखाली गेली आहे.

जिल्ह्यात एकुण 60 लघुप्रकल्प असून त्यामध्ये 4 जूनपर्यंत 26.20 दलघमी (12.47 टक्के) पाणी आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पापैकी जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्पात 5.11 दलघमी (52.84 टक्के), कल्याण मध्यम प्रकल्पात 6.72 दलघमी (54.99 टक्के), बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात 4.66 दलघमी (38.51 टक्के) पाणी आहे.

भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पात 0.69 दलघमी (11.39 टक्के), धामना प्रकल्पात 1.04 दलघमी (17.88 टक्के), जाफ्राबाद तालुक्यातील जिवरेखा प्रकल्पात 0.86 दलघमी (14.03 टक्के) तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात 4.88 दलघमी (35.25 टक्के) साठा आहे. लघुतलावांची पातळी जोत्याखाली गेल्याने येणाऱ्या काळात दमदार पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

हे तलाव जोत्याखाली

जिल्ह्यातील जालना तालुक्यातील दरेगाव, निरखेडा तांडा, वानडगाव, कुंभेफळ, पिंपळवाडी, बदनापूर तालुक्यातील आन्वी, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव कोलते, चांधई एक्को, रेलगाववाडी, जाफ्राबाद तालुक्यातील चिंचखेडा, डोलखेडा, शिंदी, अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री, मंठा तालुक्यातील तळतोंडी, पाटोदा, खोराडसावंगी, परतूर तालुक्यातील नागथस, हातडी या तलावातील पाणी पातळी जोत्याखाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT