जालना ः शहरातील यशवंत नगर भागात गुरुवार, दि. 9 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका 70 वर्षीय वृद्धेला गाठून, आम्ही पोलिस असल्याचे सांगत दोन अज्ञात भामट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या पाटल्या हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, यशवंत नगर येथील रहिवासी कमलबाई दिलीपराव हिवाळे (70, रा. यशवंत नगर, ता. जालना.) या सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास कॉलनीतील रस्त्याने फिरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. ‘आम्ही पोलिस आहोत“ असे सांगून त्यांनी बनावट ओळखपत्र दाखवले. ‘शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे तुम्ही सोन्याच्या पाटल्या घालून फिरू नका, त्या काढून ठेवा, आम्ही त्या कागदात गुंडाळून देतो,’ असा विश्वास भामट्यांनी संपादन केला.
कमलबाई आपल्या हातातील पाटल्या काढून कागदात ठेवत असताना, भामट्यांनी त्यांची नजर चुकवून हातचलाखी केली. सोन्याच्या पाटल्यांऐवजी कागदात काचेच्या बांगड्या ठेवून भामटे तिथून पसार झाले. घरी परतल्यावर संशय आल्याने कमलबाईंनी कागद उघडून पाहिला असता त्यात सोन्याचे दागिने नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे घाबरलेल्या कमलबाईंनी तत्काळ आपल्या मुलाला आणि सुनेला ही हकिगत सांगितली. परिसरात शोध घेऊनही भामटे मिळून आले नाहीत.
अखेर, 1 लाख 40 हजार रुपये किमतीच्या 5 तोळ्यांच्या दोन सोन्याच्या पाटल्यांची चोरी झाल्याप्रकरणी कमलबाई हिवाळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि वंदना गिरी करीत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गत दोन दिवसांपूर्वी शहरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. ही घटना ताजीच असताना पुन्हा दोन भामट्यांनी ज्येष्ठ महिलेस लुटले. ही घटना चिंताजनक आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.