सागर देशमुख
पारध : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांवर सध्या बीएलओ व SIR (Special Intensive Revision) कामाची अतिरिक्त जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्यापनावर परिणाम होत असल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक वेळ मिळत नसल्याची खंत पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
पारध येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत एकूण आठ शिक्षक कार्यरत असून त्यापैकी चार शिक्षक बीएलओ-SIR च्या कामात गुंतलेले आहेत. तर जिल्हा परिषद उर्दू शाळेतील पाच शिक्षकांपैकी दोन शिक्षकांवरही ही जबाबदारी आहे. त्यामुळे उर्वरित शिक्षकांवर अध्यापनाचा अतिरिक्त ताण पडत असून वर्गनिहाय नियोजनात अडचणी निर्माण होत आहेत.
शिक्षण विभागाने शाळेची वेळ सकाळच्या सत्रात ठेवून दुपारी बारा वाजेपर्यंत मर्यादित केली असली, तरी बीएलओच्या कामामुळे अनेक शिक्षकांना वारंवार शाळेबाहेर जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनात सातत्य राहत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. स्थानिक स्तरावर सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, "शिक्षक मतदारांच्या दारी, तर विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत," असे चित्र पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेतील कामांना महत्त्व असले तरी त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, अशी अपेक्षा पालक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, शिक्षकांकडून शैक्षणिक कामांबरोबरच विविध शासकीय जबाबदाऱ्या पार पाडून घेतल्या जात असल्याने जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांमध्ये साशंकता वाढत आहे. यामुळे काही पालक खासगी शाळांकडे वळत असल्याचेही बोलले जात आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निवडणूक व इतर अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, तसेच शिक्षकांना पूर्णवेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.