जालना : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवार(३१) ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप मतदारयादीबाबत नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर प्राप्त दावे-हरकतींची छाननी करून १ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या नवी दिल्ली येथील पत्रानुसार ही प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची नोंदणी भारत निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार करण्यात आली असून, एक प्रत सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदान केंद्र कार्यालयांमध्ये पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदारयादीतील आकडेवारीनुसार १६ लाख ८२ हजार ७२३ मतदार फॉर्म आहेत. यामध्ये १४ लाख ३९ हजार ५३६ मतदारांची नोंदणी डिजिटल पद्धतीने पूर्ण झाली असून, २ लाख ४३ हजार १८७ मतदारांची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
जालना विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ५८ हजार ६३७ मतदार, तर भोकरदन मतदारसंघात सर्वाधिक कमी ३ लाख २६ हजार १६७ मतदार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परतूर मतदारसंघात ३ लाख ३० हजार ३७७, घनसावंगीत ३ लाख २८ हजार ६०६ आणि बदनापूरमध्ये ३ लाख ३८ हजार ९३६ मतदार आहेत.
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार
मतदारयादी तयार करण्यासाठी पात्रता १ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित दावा दाखल करता येणार आहे. तसेच प्रारूप मतदारयादीमध्ये नावाचा समावेश करण्याबाबत कोणताही दावा अथवा नावाच्या समावेशाबाबत आक्षेप असल्यास तोही विहित मुदतीत दाखल करता येणार आहे.दावे-हरकतींसाठी ३० सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.
दावे-हरकती कुठे दाखल कराव्यात?
नागरिकांना आपले दावे, हरकती अथवा अपील संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात, तसेच संबंधित निवडणूक विभागाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे दाखल करता येणार आहेत.
यासाठी संबंधित कार्यालयात अथवा BLO यांच्याकडे आवश्यक अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.