जालना ः पतीचे बाहेर असलेल्या अनैतिक संबंधाला विरोध केला म्हणून चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या चौघाविरोधात चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा नरसिंग गायकवाड (23, रा. नागेवाडी, जालना) यांचे लग्न ऑक्टोबर 2022 मध्ये नरसिंग डिगांबर गायकवाड यांच्याशी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे दोन वर्षे संसार नीट चालला, मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींनी किरकोळ कारणावरून मनीषा यांना टोमणे मारणे आणि त्रास देणे सुरू केले. पीडित महिलेने आरोप केला आहे की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असून, त्या कारणावरून पतीने तिच्याशी संबंध ठेवणे बंद केले होते.
या त्रासाबाबत मनीषा यांनी माहेरी सांगितल्यानंतर वडिलांनी सासरच्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दिवस उलटताच पुन्हा छळ सुरू झाला. 14 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पती नरसिंग गायकवाड यांनी मनीषा यांना शिवीगाळ करत चापट बुक्क्यांनी मारहाण केली.
माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावत विवाहितेला बेदम मारहाण करून घराबाहेर हाकलून देण्यात आले. सततच्या मारहाणीला कंटाळेल्या मनीषा गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पती नरसिंग गायकवाड, सासू दुर्गा गायकवाड, सासरे डिगांबर गायकवाड आणि नणंदोई आकाश धोतरे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.