जालना ः जालना शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी मेघ गर्जना व विजेच्या कडकडाटात गारांचा पाऊस पडला. अवकाळी पाऊस व गारांमुळे रब्बीच्या गहू, हरभरा,ज्वारीसह कांदा बी व इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात 19 तारखेपासून पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. गुरुवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसास सुरुवात झाली. यावेळी बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे बोरा एवढ्या गारा पडल्या.
जालना शहरात काही ठिकाणी हरभरा एव्हढया तर काही ठिकाणी त्यापेक्षा मोठ्या गारा पडल्या. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.परतूर येथेही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरणानंतर पडलेल्या पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी उष्मा वाढला होता.
पाऊस सुरू होताच वीजपुरवठाही वारंवार खंडित झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागला. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा बी सह इतर पिकांना या पावसामुळे मोठा फटका बसल्याचे समजते. शहरातील नवीन मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल भिजू नये यासाठी व्यापाऱ्यांना पळापळ करावी लागली. सुमारे अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून आले. अंबड, बदनापूरसह इतर ठिकाणी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते.
घनसावंगी तालुक्याला गारपिटीचा तडाखा
घनसावंगी तालुक्याला गुरुवार, दि.19 रोजी दुपारनंतर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. गारांचा प्रचंड वर्षाव झाल्याने रांजणी, बाणेगाव, कुंभार पिंपळगाव, चिंचोली, शिंदखेड, बोडखा, मांदळा, ढाकेफळ आदी गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली.
काही भागांत गारांचा अक्षरशः सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसह ज्वारी आणि विविध भाजीपाला पिकांची काढणी अंतिम टप्प्यात होती. अनेक शेतकऱ्यांनी काढलेली पिके शेतातच होती, तर काही ठिकाणी काढणी सुरू होती. अचानक झालेल्या पावसामुळे ही पिके पूर्णपणे भिजली असून गहू व हरभऱ्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
म्हैस व बैल दगावले
बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे गारांचा पाऊस पडला. पावसामुळे डाळिंबासह रब्बी पिकांचेे नुकसान झाले. काजळा, भिलपुरी, दरेगाव येथे पाऊस पडला. जालना तालुक्यातील नसडगाव येथे वीज पडून बैल दगावला. घनसावंगी तालुक्यातील बोरगाव खुर्द येथे वीज पडून म्हैस दगावली.