Sangli Rain : जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा

गारांसह जोरदार पाऊस ः वीजपुरवठा खंडित; द्राक्षबागांसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान
Sangli Rain
जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा
Published on
Updated on

सांगली : सांगली शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत मंगळवारी सायंकाळी विजांचा लखलखाट व गारांसह पडलेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मात्र नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला.

मंगळवारी दिवसभर असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी विजांच्या लखलखाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा बराच काळ खंडित झाला होता.

मिरज शहरासह ग्रामीण भागात गारांसह पाऊस; शेतीचे नुकसान

मिरज : शहरासह ग्रामीण भागामध्ये मंगळवारी रात्री सुमारे तासभर विजांच्या कडकडाटासह गारांचा वर्षाव करीत पाऊस पडला. या पावसामुळे ज्वारी, मका, द्राक्षे, आंबा अशा पिकांचे नुकसान झाले. सुमारे तासभर पाऊस कोसळला. सकाळपासून शहरात उष्मा जाणवत होता. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. मल्लेवाडी, एरंडोलीसह ग्रामीण भागामध्येदेखील गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे रात्री शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.

कुपवाडसह ग्रामीण भागात गारांचा पाऊस

कुपवाड : शहरासह विस्तारित परिसर तसेच सावळी, बामणोली आदी गावांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. दिवसभर उकाडा होता. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षणांतच अवकाळी पावसाने झोडपले. पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडित केला होता.

आरग परिसरात पाऊस

आरग : आरग (ता. मिरज) परिसरामध्ये काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. बेदाणा उत्पादकांना सर्वात मोठा फटका या पावसाने बसला आहे. मिरजपूर्व भागात द्राक्ष बागायतीसह शाळू, हरभरा, मका या वार्षिक पिकांची मळणी पूर्ण झालेली नाही. त्यातच पाऊस कोसळला.

जत ः वादळी वाऱ्याचा तडाखा; सनमडीत गारांसह पाऊस

जत शहर : जत तालुक्यात मंगळवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. जोरदार वाऱ्यासह धुळीचे लोट उसळल्याने नागरिकांची काही काळ धांदल उडाली. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. सनमडी येथे गारांसह पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोळगिरी येथेही पाऊस झाला आहे. माडग्याळसह अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. जतसह तालुक्यात सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. सनमडी येथेही गारांसह पाऊस पडला. यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news