जालन्यात पीकविमा वाटपाची प्रतीक्षा pudhari photo
जालना

Jalna crop insurance : जालन्यात पीकविमा वाटपाची प्रतीक्षा

खरीप 1723 कोटी तर रब्बी 338 कोटींच्या विम्याचे संरक्षण; खरिपात 3 लाख तर रब्बीत 90 हजार हे. क्षेत्र संरक्षित

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग दिसून आला असून, आता विमा रकमेच्या वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरीप हंगामासाठी सुमारे 1,723 कोटी रुपये तर रब्बी हंगामासाठी 338 कोटी रुपयांची विमा रक्कम संरक्षित करण्यात आली आहे.

यापैकी पडताळी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसानपोटी विम्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेत खरीप हंगामात तब्बल 2 लाख 61 हजार 726 शेतकरी सहभागी झाले असून 5 लाख 54 हजार 928 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये 3 लाख 17 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी सुमारे 30.78 कोटी रुपयांचा हप्ता भरला असून राज्य व केंद्र शासनाने प्रत्येकी 88.06 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. एकूण विमा हप्ता रक्कम 206.90 कोटी असून विमा संरक्षित रक्कम 1,723.56 कोटी रुपये इतकी आहे.

भोकरदन, घनसावंगी व जाफराबाद तालुक्यांमध्ये सर्वाधिक सहभाग नोंदवण्यात आला आहे. तर बदनापूर व परतूर तालुक्यांमध्ये तुलनेने कमी क्षेत्र विमा अंतर्गत आले आहे.

रब्बी हंगामात 73 हजार 691 शेतकरी सहभागी झाले असून 1 लाख 31 हजार 468 अर्ज सादर झाले आहेत. सुमारे 90 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी 3.35 कोटी रुपयांचा हप्ता भरला असून एकूण विमा संरक्षित रक्कम 337.95 कोटी रुपये आहे.

अवकाळीने पिकाचे मोठे नुकसान

गुरुवार, दि. 19 रोजी जिल्हाभरातील बहुतांश गावात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. या गारपिटीने शेतकऱ्यांनी सोंगून ठेवलेला गहू, ज्वारी, कांदा आदींसह फळपिकांचे नुकसान झाले आहे.

एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित होण्याची शक्यता

सद्यस्थितीत दोन्ही हंगामातील विमा रक्कम वाटपाबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. विशेषतः अवकाळी पाऊस व पिकांच्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या मदतीची मोठी अपेक्षा आहे. शासनाकडून लवकरच स्पष्ट आदेश येण्याची शक्यता असून एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने रक्कम वितरित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना मदतीमुळे दिलासा मिळेल.

पात्र शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्याच्या सूचना - ही रक्कम संरक्षित रक्कम आहे. यापैकी पात्र शेतकऱ्यांना पीकविम्याचे वाटप विमा कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यांची पडताळणी सुरू आहे. आम्ही विमा कंपन्यांना पात्र शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वाटप करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गहिनीनाथ कापसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT