Jalna Crime News : Son's fatal knife attack on mother's 'live-in' partner
जालना, पुढारी वृत्तसेवा : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या साथीदारावर मुलानेच अचानक चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना जुना जालन्यातील नूतन वसाहत परिसरात घडली आहे. या हल्ल्यात इक्बाल अहमद शफी अहमद (वय ४२) हे गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी इक्बाल अहमद शफी अहमद हे गेल्या १५ वर्षांपासून ते एका महिलेसोबत तिच्या दोन मुलांसह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात. शनिवारी (दि. २९) दुपारी २ वाजेच्या सुमारास त्या महिलेचा लहान मुलगा ऋत्विक जाधव याने विनाकारण त्यांना शिवीगाळ केली. कारण विचारताच संतप्त झालेल्या ऋत्विकने त्याच्याजवळील चाकू काढून इक्बाल यांच्या पोटाच्या डाव्या व उजव्या बाजूवर सपासप वार केले. त्यांचा मित्र शौकतने प्रसंगावधान राखून मध्यस्थी करत ऋत्विकला बाजूला ढकलले.
उपचारादरम्यान प्रकृती स्थिरावल्यानंतर पीडित इक्बाल अहमद यांच्या जबाबावरून मंगळवारी (दि.१) कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपी ऋत्विक जाधव याच्याविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(२) (धारदार शस्त्राने गंभीर दुखापत करणे) आणि कलम ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान व शिवीगाळ करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे शस्त्रक्रिया
ऋत्विक घटनास्थळावरून पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेतील इक्बाल यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. रविवारी (दि. ३० ऑगस्ट) सकाळी इक्बाल यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सामान्य रुग्णालयात रेफर केले. जखमीच्या पोटावर तेथे शस्त्रक्रिया करण्यात आली.