Crime News  Pudhari
जालना

Jalna Crime : सुनेकडून सासऱ्याला काठीने बेदम मारहाण

लेकही सहभागी; माहेर जवळा येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

जालना : घर हे सुरक्षिततेचे ठिकाण मानले जाते; मात्र याच घरात जर अत्याचार घडू लागले तर समाजाच्या नैतिकतेवर मोठा प्रश्न निर्माण होतो. घनसावंगी तालुक्यातील माहेर जवळा येथे अशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

कुंडलिक गव्हाणे (55) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गुरुवार, दि. 2 रोजी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ते घरी असताना त्यांना भूक लागल्याने सुनेला जेवणाबाबत विचारणा केली. यावरून किरकोळ वाद निर्माण झाला. वाद इतका टोकाला गेला की सुनेने संतापाच्या भरात काठी उचलून सासऱ्यावर डोक्यावर, कानावर व हातांवर मारहाण केली.

या घटनेदरम्यान मुलगाही तेथे उपस्थित राहून वडिलांना मदत करण्याऐवजी उलट मारहाणीत सहभागी झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. शिवीगाळ करत ‌‘येथे राहायचे नाही‌’ अशी धमकी देत दोघांनीही वृद्धास जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात सून अनिता दीपक गव्हाणे व मुलगा दीपक कुडलिक गव्हाणे रा.माहेर जवळा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार बाबासाहेब गोल्डे करीत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे समाजात वाढत चाललेल्या असहिष्णुतेची व कौटुंबिक नात्यांतील संवेदनशीलता कमी होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. जिथे आई-वडील देवासमान मानले जातात, तिथेच त्यांच्यावर होणारे अत्याचार ही केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिक अध:पतनाची नांदी असल्याची भावना व्यक्त होत आहे. शिवाय, जिथे मायेचा स्पर्श हवा आहे तिथेच मारहाण होत असल्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT