Jalna Cloudy weather; crops at risk
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी प्रमुख पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असून पिकांच्या संरक्षण व वाढीसाठी शेतकऱ्यांकडून विविध शेतीकामांना वेग आला आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तालुक्यातील सुमारे ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आली आहे. मका व हरभरा पिकांवर काही ठिकाणी अळीचा प्रादर्भाव दिसून येत असल्याने फवारणीचे काम सुरू झाले आहे. तर गहू पिकावर तणांचा वाढता प्रादर्भाव रोखण्यासाठी तणनाशकांची फवारणी केली जात आहे.
काही दिवसांपासून तालुक्यात थंडीची तीव्रता वाढली असून ही परिस्थिती रब्बी पिकांच्या वाढीस अनुकूल ठरत आहे सकाळचे दवबिंदू कमी तापमानामुळे पिके तरारलेली आहेत. तालुक्यातील काही भागात मका व हरभरा पिकांवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी तातडीने कीटकनाशकांची फवारणी करत आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात व योग्य औषधांचा वापर करून फवारणी केली जात असून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सतर्क झाले आहेत. अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांवर होणारा इजा रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेतली आहे. काही ठिकाणी पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेत कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
तालुक्यातील काही भागात मका व हरभरा पिकांची लागवड करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नुकसान टाळण्यासाठी शेतकरी तातडीने कीटकनाशकांची फवारणी करावी. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात व योग्य औषधांचा वापर करून फवारणी केली जात आहे.- राजेंद्र तळेकर, कृषी सहायक भोकरदन