जालना ः धनादेश अनादर (चेक बाउन्स) प्रकरणात जालना येथील चतुर्थ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. देवरशी यांनी संशयित महिलेला दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच धनादेशाची रक्कम आणि त्यावर व्याजासह नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, दयालदास डेम्बडा यांनी महिलेस व्यवसाय आणि परमिट रूमच्या परवान्यासाठी दोन टप्प्यांत धनादेशाद्वारे एकूण 10 लाख 50 हजार रुपये दिले होते. रकमेच्या परतफेडीसाठी महिलेने 28 डिसेंबर 2016 रोजी 10 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश डेम्बडा यांना दिला होता. त्यांनी धनादेश बँकेत जमा केला असता, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो परत आला. त्यानंतर कायदेशीर नोटीस देऊनही महिलेने रक्कम परत केली नाही.
अखेर डेम्बडा यांनी ॲड. पी. जी. लाहोटी यांच्यामार्फत न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम 138 अंतर्गत खटला दाखल केला. न्यायालयाने आरोपीच्यावतीने युक्तिवादात बचावासाठी सादर केलेले मुद्दे फेटाळून लावत सर्व पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने महिलेस दोषी ठरवले आणि त्यांनी फिर्यादी दयालदास डेम्बडा यांना मूळ रक्कम, व्याजासह 18 लाख 71 हजार 583 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.