जालना: जालना शहरातील समर्थनगर परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. किशोरसिंग ऊर्फ टकल्या रामसिंग टाक (वय ३०, रा. व्दारकानगर, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत मोटारसायकल, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि रोख रक्कम असा २ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, ९ ऑक्टोबर रोजी जुना जालन्यातील समर्थनगर येथे ३० सप्टेंबर रोजी झालेल्या घरफोडीतील आरोपी किशोरसिंग ऊर्फ टकल्या टाक हा व्दारकानगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने समर्थनगर येथील घरफोडीची कबुली दिली. तसेच कसबा, जुना जालना, जयशंकरनगर आणि गोपीकिशननगर परिसरातील आणखी तीन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे सांगितल्याने एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहे.
आरोपीने गुंडेवाडी परिसरातून सुमारे १५ दिवसांपूर्वी चोरी केलेल्या दुचाकीचा वापर करून त्याने दोन फरार साथीदारांच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती दिली. चोरी केलेले दागिने एका सोनाराला विकल्याचेही त्याने सांगितले आहे. या प्रकरणातील दोन साथीदार आणि संबंधित सोनाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.