Bhokardan Gold Robbery
भोकरदन : सोन्याचे दागिने अथवा सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून एका सोनाराकडून १ लाख ८० हजार रुपये जबरीने हिसकावून नेल्याच्या प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली १ लाख ८० हजार रुपयांची संपूर्ण रोख रक्कम जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी दानापूर, ता. भोकरदन, जि. जालना येथे सोने कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी संजय कालीपद महीती (वय ४६ वर्षे, व्यवसाय सोनार, रा. जळगाव) यांच्याकडून १ लाख ८० हजार रुपये धक्काबुक्की करून जबरीने हिसकावून नेण्यात आले होते. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांच्या पथकाने मस्तानखाँ मसीदखाँ पठाण (रा. कठोरा बाजार, ता. भोकरदन, जि. जालना) आणि शेख कदीर शेख हमीद (रा. दानापूर, ता. भोकरदन, जि. जालना) या दोघांना ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता गुन्ह्यातील रक्कम त्यांच्याकडे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपी मस्तानखाँ मसीदखाँ पठाण याच्याकडून ६० हजार रुपये, तर शेख कदीर शेख हमीद याच्याकडून १ लाख २० हजार रुपये, अशी एकूण १ लाख ८० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
या कारवाईमुळे गुन्ह्यातील चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास भोकरदन पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वीनीसिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक डॉ. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके, पोलीस अंमलदार गणेश पिंपळकर, अर्जुन टेकाळे, योगेश गवळी, लक्ष्मण रानगाते तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी साजेद शेख यांनी सहभाग घेतला.