Anwa To Pandharpur Palkhi Sohla
सादिक शेख
आन्वा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी आषाढी वारी सोहळ्यानिमित्त विविध संतांच्या पालख्या व दिंड्या भुवैकुंठ पंढरीकडे प्रस्थान करत आहेत. त्यापैकीच एक भोकरदन तालुक्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र आन्वा येथील संत सद्गुरू श्रीविठोबादादामहाराज चातुर्मास्ये, श्रीविठ्ठल रुख्मिणी संस्थानच्या मानाच्या पायी दिंडीने श्रीसंस्थानचे पंधरावे विद्यमान पीठाधीश परमपूज्य सद्गुरु श्रीज्ञानेश्वर माऊलीमहाराज चातुर्मास्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.३०) दुपारी १२.३० वाजता प्रस्थान केले.
यावेळी दिंडी सोहळा प्रमुख ह.भ.प. कैवल्य महाराज चातुर्मास्ये, ह.भ.प. श्री राधेश्याम महाराज चातुर्मास्ये, ह.भ.प.श्री.नित्यानंद महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील वैष्णव, वारकरी व महिला भाविक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
सन १७३० मध्ये संत सद्गुरु श्रीविठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांनी ही परंपरा सुरू केली. स्वतः १२ वर्षे पायी वारी पूर्ण केल्यानंतर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने त्यांना चातुर्मास वारी करण्याची आज्ञा दिली. आषाढी ते कार्तिकी या कालावधीत चातुर्मास कीर्तनसेवा करण्याची परंपरा त्यातून सुरू झाली. त्यानंतर गादीवरील सद्गुरूंनी ही परंपरा अखंड सुरू ठेवली आहे.
श्रीक्षेत्र आन्वा येथील संतश्री सद्गुरु विठोबादादा महाराज चातुर्मास्ये यांनी सुमारे २७२ वर्षांपूर्वी पंढरपूर येथे चातुर्मास कीर्तनसेवेची परंपरा सुरू केली होती. गेल्या पंधरा पिढ्यांपासून ही परंपरा आजही अखंड सुरू आहे.विद्यमान पीठाधिश महाराज पंढरपूर येथे चार महिने वास्तव्य करीत असतात.
पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावरील श्री चातुर्मास्ये महाराज मठात संतश्री विठोबादादा महाराज व सद्गुरु श्री मैराळ महाराज यांच्या समाधी मंदिरे आहेत. चातुर्मास काळात पंढरपूर येथे काकडा भजन, श्रीमद्भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ तसेच सायंकाळी विद्यमान पीठाधीश महाराजांचे कीर्तन असा नित्यक्रम असतो.
श्रीक्षेत्र आन्वा येथून ३० जून रोजी दिंडीचे प्रस्थान झाले. आन्वा – सिल्लोड – आळंद – फुलंब्री – हर्सूल – नक्षत्रवाडी – कौटगाव – श्रीक्षेत्र पैठण – सोनविहीर – लाड जळगाव – मातोरी – बावी – उंबरविहीर – पारगाव (घुमरा) – जायभायवाडी – तिंत्रज – रत्नापूर – जुने डोमगाव – लोणी – श्रीक्षेत्र लहूळ – आष्टी असा २२ दिवसांचा सुमारे ४५० किलोमीटरचा प्रवास करत सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत पायी दिंडी २१ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराजांचे अवतारकार्य पूर्ण झाल्यानंतर चातुर्मासात कीर्तनसेवा कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर साक्षात भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या आदेशानुसार चातुर्मासात दररोज कीर्तन करण्याची श्रीपरंपरा सुरू झाली. आजही श्रीक्षेत्र पंढरपूर येथे ही परंपरा अखंडपणे सुरू आहे, अशी माहिती दिंडी सोहळा प्रमुख ह.भ.प. कैवल्य महाराज चातुर्मास्ये यांनी दिली.