जालनाः मोतीतलाव शेजारी होणाऱ्या भीम पार्क विपश्यना केंद्राचा मुद्दा विषय पत्रिकेवर न घेतल्याने नगरसेवक निखिल पगारे आक्रमक झाले. यामुळे सभागृहात काहीकाळ गदारोळ निर्माण झाला.  pudhari photo
जालना

Jalna Bhimpark Vipassana center : ‘भीम पार्क’च्या मुद्द्यावर सभागृहात गोंधळ, विषय पत्रिकेवर न घेतल्याने संताप !

१३१ कोटींच्या प्रकल्पाचा मुद्दा विषय पत्रिकेवर न घेतल्याने विरोधक आक्रमक; महापौरांनी सभा केली १० मिनिटे तहकूब

पुढारी वृत्तसेवा

जालना : शहरातील मोतीतलाव परिसरात भीमपार्क विपश्यना केंद्राचा विषय विषय पत्रिकेवर न घेतल्यामुळे विरोधी पक्षगट आक्रमक झाला. हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी का ठेवला नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करत शहरातील बौध्द समाजासह इतर सर्व समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. शिवाय, येथे सर्वांना विपश्यनेचे धडे मिळतील, अशी मागणी लावून धरत विरोधकांनी काही वेळ गोंधळ घातला. यामुळे महापौरांना १० मिनिटे सभा तहकूब करावी लागली.

दरम्यान, मंगळवार, १४ रोजी महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. यावेळी विविध विषय सदस्यांच्यावतीने सभागृहापुढे मांडण्यात आले. सदस्या दर्शना खोतकर झोल यांनी मोतितलाव शेजारी प्रस्ताववित भीम पार्क विपस्यना केंद्राचा मुद्दा उपस्थिेत करताच त्याला दुजोरा देत निखिल पगारे, विरोधी गटनेता कमलेश खरे यांनी दुजोरा देत सभागृह दणाणून सोडले.

आपला विषय ताणून धरत निखील पगारे यांनी आपल्या हातातला माईक फेकून देत आपला संताप व्यक्त केला. यावेळी काहीकाळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. या गदारोळात महापौर वंदना मगरे यांनी सभा १० मिनिटे सभा तहकूब केली. यावेळी उपमहापौर राजेश राऊत, आयुक्त अंजली शर्मा, नगरसचिव केशन कानपुडे आदींसह सर्व सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील अनधिकृत वस्त्या अधिकृत करून पीआर कार्ड द्यावे, अशी मागणी सदस्यांनी करताच आयुक्त अंजली शर्मा यांनी सांगितले, की सध्या एजन्सीमार्फत सर्वे करण्यात येत आहे. पीआरकार्ड देण्याचा अधिकार महसूल विभागाचा आहे. या संदर्भातील संचिका महापालिकेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी अक्षय गोरंट्याल यांनी सोलर प्रकल्प याविषयी कामाची प्रगती आणि प्रशासनाने काय पावले उचलली आहेत यावर चर्चा केली. त्यानंतर जालना शहराचा जीएसटीचा वाटा जास्त आहे. पण प्रत्यक्षात कमी मिळतो. याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

यावेळी महापालिकेच्या मालकीचा कोंडवाडा एका व्यक्तीने ताब्यात घेतला आहे. अतिक्रमण केले आहे. तो आपला ताब्यात घ्या. महात्मा फुले आणि जवाहर बाग मार्केट देखील आपल्या ताब्यात घ्यावी. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, अशा सूचना सदस्यांनी केल्या. यावेळी अश्विन अंबेकर यांनी प्ले ग्राउंडचा विकास करण्याची मागणी केली.

यावेळी आयुक्त अंजली शर्मा यांनी सांगितले, की महानगर मालकीच्या जागा आपण आपल्या ताब्यात घेऊ. ज्या कोर्ट केस चालू आहे त्या सोडून. ज्या जागा आपल्या नावावर नाही, पण वापरात आहे, त्या जागा आपण ताब्यात घेऊ. प्रयत्न करण्यात येणार आहे.

तर पुढच्या बैठकीत मी स्वतः विषय घेईल : महापौर वंदना मगरे

भीम पार्क विपश्यना केंद्रासाठी १३० कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हा मुद्दा सभागृहात चर्चेत येणे अपेक्षित असताना यात टाळाटाळ करण्यात आल्याच्या आरोपवर महापौर वंदना मगरे यांनी पुढच्या बैठकीत हा विषय मी स्वत: विषय पत्रिकेवर घेईल, अशी ग्वाही दिली. तर नगरसचिव केशव कानपुडे यांनी सांगितले, की हे क्षेत्र तलावाखाली दाखवण्यात आले. या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी नगर विकास विभागात सादर केल्या आहेत. या संदर्भातला सविस्तर डीपीआर, फ्लेक्झियबिलीटी यावर चर्चा केली जाणार आहे. पुढच्या बैठकीत हा विषय पटलावर घेऊ, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT