Jalna Assault Case pudhari photo
जालना

Jalna Crime : मारहाण प्रकरणात आरोपींना कारावासासह दंडाची शिक्षा

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल, दहा साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या

पुढारी वृत्तसेवा

जालना : मारहाण प्रकरणात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना दोन वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-५ श्रीमती बी. एस. गारे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

या प्रकरणात आरोपी रोहिदास बाबूलाल पिंपळे, सुनील ताराचंद चिकसे, अनिल ताराचंद चिकसे आणि राजू देवलाल नवट यांना दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर आरोपी अनिल बाबूलाल पिंपळे, ज्योती किशोर पिंपळे, पूजा अनिल पिंपळे, मीना ऊर्फ राधा रमेश पिंपळे आणि किशोर बाबूलाल पिंपळे यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

तसेच संबंधित आरोपींना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. आरोपी संगीता पिंपळे यांना चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर सोडण्यात आले.पिरपिंपळगाव येथे २३ एप्रिल २०२० रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपींनी फिर्यादीच्या घरात जाऊन जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने हातातील बांबूच्या काठ्या, लाकडी काठ्या व चापट-बुक्क्यांनी फिर्यादी सुनीता गणेश पिंपळे व इतरांना मारहाण केली होती.

या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, जखमी साक्षीदार, पंच, डॉक्टर आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अॅड. डॉ. दीपक ना. कोल्हे, अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. निकालाच्या दिवशी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एस. आर. ढोकरट यांनीही काम पाहिले.

जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस स्टेशनचे अधिकारी किरण बिडवे, पोलीस निरीक्षक तसेच सेशन कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार आणि जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात सहकार्य केले.

यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या

या खटल्यात सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, जखमी साक्षीदार, पंच, डॉक्टर आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT