Ambad Cow killed in leopard attack
सुखापुरी : अंबड तालुक्यातील रुई परिसरात आज (दि.१५) सकाळी उघडकीस आलेल्या घटनेने गावकरी हादरून गेले आहेत. भागवत श्रीराम ढवळे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने घुसून बांधलेल्या गाईचा फाडसा पाडल्याची गंभीर घटना घडली आहे. सकाळी गोठ्यामध्ये गाईचा मृतदेह आढळताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहेत.
रुई गावालगत असलेल्या ढवळे यांच्या शेतात गोठा व आखाडा असून दररोजप्रमाणे काल रात्री गाईला गोठ्यात बांधून ते घरी परतले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात फिरणारा बिबट्या थेट गोठ्यात घुसला. गोठ्यामधील गाईवर त्याने हल्ला केला आणि काही क्षणातच तिचा फाडसा पाडला. गाईच्या पाठीमागील भागाचे लचके तोडलेले दिसून आले. या हल्ल्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाला.
पहाटे दूध द्यायला गोठ्याकडे गेलेल्या ढवळे यांना गाईचा मृतदेह दिसताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. गाईचा पूर्ण पाठीमागील भाग ओरबडलेला, आजूबाजूला रक्ताचे डबके आणि बिबट्याचे पाऊलखूण दिसत होत्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना व वनविभागाला कळविले. काही वेळातच व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वनअधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृत गायीचे पोस्टमार्टम केले. गाईचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळेच झाल्याचे प्राथमिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. पुढील चौकशीत बिबट्या कोणत्या दिशेने आला व कुठे गेला याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरात पिंजरे लावण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.
वनअधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी एकटे शेतात किंवा पायवाटांवर न जाण्याचा इशारा दिला आहे.
घटनेनंतर गावकरी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले. गेल्या काही दिवसांपासून परिसरात बिबट्या फिरत असल्याच्या चर्चा होत होत्या, परंतु प्रत्यक्ष हल्ला झाल्याने भीती अधिक वाढली आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी सकाळी कुणीही जायला तयार नव्हता. विशेषतः महिला, वृद्ध आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेत शेतकरी ढवळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी संबंधित शेतकऱ्याला तत्काळ सरकारी भरपाई देण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली.