Crime News Pudhari
जालना

Jalna Crime | महिनाभरात दोन खून, वाढती भाईगिरी; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न

रुई गावात वाढती गुन्हेगारी, तरुण ,अल्पवयीनांकडे तीक्ष्ण हत्यारे; पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

Ambad Rui Police case

सुखापुरी : अंबड तालुक्यातील रुई गावावर दोन खुनांच्या घटनांनी भीतीचे गडद सावट पसरले आहे. किरकोळ वादांचे रूपांतर उघड दहशतीत होत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे काही अल्पवयीन मुलांकडेही चाकू, कोयते यांसारखी तीक्ष्ण हत्यारे आढळत असल्याच्या चर्चा गावभर रंगल्या असून, पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

गावातील चौक, गल्लीबोळ आणि सार्वजनिक ठिकाणी टोळक्यांची वाढती वर्दळ, रात्री उशिरापर्यंतची भटकंती आणि शस्त्रांची उघड मिरवणूक यामुळे सर्वसामान्य नागरिक दडपणाखाली जगत आहेत. “वाद झाला की थेट हत्यार काढले जाते,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. युवकांमध्ये वाढती भाईगिरी आणि त्याला मिळणारी मूक साथ यामुळे सामाजिक वातावरण बिघडत चालल्याची खंत वयोवृद्ध व्यक्त करतात.

या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रतिबंधात्मक गस्त, संशयित टोळक्यांवर लक्ष, शस्त्रबंदीची काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेवर समुपदेशन यांचा अभाव असल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. “घटना घडल्यानंतर हालचाल दिसते; पण आधीच रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत,” अशी नाराजी व्यक्त होते.

दरम्यान, ग्रामपंचायत, शाळा आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. शाळा-महाविद्यालयांत जनजागृती व समुपदेशन, पालक-पोलीस-ग्रामस्थ संयुक्त बैठक, सीसीटीव्ही बसविणे, रात्रीची संयुक्त गस्त, आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई या उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.

सलग दोन खुनांनी दोन कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केलेच; पण रुईकरांच्या मनातील सुरक्षिततेची भावना हादरवली आहे. गाव पुन्हा शांततेकडे वळण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि नागरिक यांनी समन्वयाने, सातत्यपूर्ण आणि दृश्यमान कृती करणे ही काळाची गरज ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT