Jamkhed Gram Panchayat  Pudhari
जालना

Jalna News | जामखेड ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारावर अखेर कारवाईचा बडगा

ग्रामपंचायत अधिकारी एम. एम. मिसाळ निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश, इतरांवरही कारवाईचे संकेत

पुढारी वृत्तसेवा

Ambad Jamkhed Gram Panchayat Fraud

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड ग्रामपंचायतीमधील गेल्या तीन वर्षांतील कथित आर्थिक आणि प्रशासकीय अनियमिततेच्या प्रकरणात अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ग्रामपंचायत अधिकारी एम. एम. मिसाळ यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनी निलंबित केले असून, त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

ग्रामपंचायतीच्या कारभारातील विविध बाबींबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान ई-निविदा प्रक्रिया, विविध विकासकामांमधील शासकीय कपाती, रस्ता सुधारणा कामाचे प्रमाणपत्र, अंगणवाडी दुरुस्तीच्या कामासाठी मंजूर करण्यात आलेला ठराव, तसेच धूर फवारणी आणि टीसीएल खरेदीसाठी सुमारे १ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चाला परवानगी देण्यासंदर्भात आक्षेप नोंदविण्यात आल्याचे कारवाईच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा खुलासा आणि गटविकास अधिकाऱ्यांचा अभिप्राय विचारात घेण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने मिसाळ यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती, बदनापूर येथे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीही सुरू करण्यात येणार आहे.

तक्रारदाराच्या पाठपुराव्याला यश

जामखेड ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेप्रकरणी चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, यासाठी तक्रारदार पंकज मंडलिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केल्याने त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचे मानले जात आहे.

या कारवाईनंतर मंडलिक यांनी प्रशासनाचे आभार मानले. दबाव आणि धमक्यांना न घाबरता आपण पाठपुरावा सुरू ठेवला आणि अखेर प्रशासनाने कारवाई केली, असा दावा त्यांनी केला.

इतरांवरही कारवाई होणार?

ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित अनियमिततेच्या प्रकरणात एका अधिकाऱ्याच्या निलंबनानंतर आता चौकशीचा पुढील टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. चौकशीदरम्यान समोर आलेल्या विविध बाबींमध्ये अन्य कोणाची जबाबदारी निश्चित होते आणि संबंधितांवर आणखी कोणती कारवाई केली जाते, याकडे जामखेडमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. विभागीय चौकशीतून पुढे येणाऱ्या निष्कर्षांनंतर या प्रकरणाला आणखी कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT