Jalna Agriculture News : पावसाने उघडिप दिल्याने शेतीच्या कामांना आला वेग file photo
जालना

Jalna Agriculture News : पावसाने उघडिप दिल्याने शेतीच्या कामांना आला वेग

खुरपणी, कोळपणी आणि डवरणी सारख्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य

पुढारी वृत्तसेवा

Jalna Agriculture News: Farm activities gain momentum as rain stops

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसानंतर आता टेंभुर्णीसह जाफ्राबाद तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांना वेग आला आहे.

पावसामुळे थांबलेली वाफसा आणि ओलावा कमी झाल्याने जमीन मशागतीसाठी योग्य झाली आहे. परिसरातील शेतकरी आता खुरपणी, कोळपणी आणि डवरणी सारखी महत्वाची कामे करण्यासाठी शेतात उतरले आहेत.

काही ठिकाणी मजुरांची टंचाई असल्याने शेतकरी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मशागतीच्या कामात गुंतले आहेत. आधुनिक युगात ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी टेंभुर्णी परिसरातील अनेक भागात आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साहाय्याने शेती मशागत केली जात आहे.

शेतकरी कुटुंब पहाटेपासूनच शेतात राबताना दिसत आहेत. पावसामुळे शेतात गवत वाढले होते आणि कामे खोळंबली होती. आता उघडीप मिळाल्याने पिकांना खुरपणी आणि फवारणीची नितांत गरज आहे. हातात वेळ कमी असल्याने संपूर्ण कुटुंब शेतात राबत असल्याचे टेंभुर्णी येथील शेतकरी सांगत आहेत. शेतातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून बैलांच्या तोंडाला मुसके बांधून अत्यंत काळजीपूर्वक ही कामे केली जात आहेत. पावसाच्या या उघडीपीमुळे पिकांनाही चांगला सूर्यप्रकाश मिळत असून पिके जोमात येण्यास मदत होईल, अशी आशा परिसरातील बळीराजा व्यक्त करत आहे.

आजकाल मजुरीचे दर खूप वाढलेत. पैसे देऊनही मजूर मिळेत नसल्याने घरच्या माणसांचाच जास्त राबावा लागते. आम्ही एवढी हार्ड झिजवून मशागत करतो, पिकाला पोटच्या पोरासारखं जपतो. पण जेव्हा पिकाला भाव मिळायची वेळ येते, तेव्हा आमच्या पदरात निराशा पडते, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

निसर्गाने साथ दिली आणि बाजारात दोन पैसे चांगले मिळाले तरच शेतकरी यांच्या घामाचे चीज होईल. सततच्या नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी जीवत ठेवण्यासाठी बि-बियाणे, खंत, औषधीचे भाव आवाक्यात ठेवण्याची गरज आहे. वाढत्या महागाईनुसार शेतमालाला भाव देणे अपेक्षित आहे.
- मनोहर सवडे, शेतकरी, अकोलादेव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT