जालना : जालना जिल्ह्यात मार्च २०२६ अखेर साडेसात अश्वशक्ती (एचपी) पर्यंतच्या कृषी वीज अग्राहकांची संख्या १ लाख ३८ हजार ४६४ असून, या ग्राहकांकडे २ लाख ४९ हजार ५५३.७६ लाख रुपये (सुमारे ₹२,४९५.५४ कोटी) इतकी वीज थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने अलीकडेच साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी ग्राहकांची वीज थकबाकी माफ करण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी महत्त्वाची मानली जात आहे.
जिल्ह्यातील जालना विभाग-१ मध्ये ७७ हजार ४६४ कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे सुमारे १,३७०.१३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या विभागात भोकरदन ग्रामीण उपविभाग सर्वाधिक थकबाकीदार असून तेथील २८ हजार ३४ ग्राहकांकडे ४८८.७९ कोटी थकबाकी आहे. त्यापाठोपाठ जालना ग्रामीणमध्ये ३६०.५३ कोटी, जाफराबादमध्ये ३१६.३७ कोटी, बदनापूरमध्ये १९६.७१ कोटी, तर जालना शहरी उपविभागात ७.७३ कोटी थकबाकी आहे.
जालना विभाग-२ मध्ये ६१ हजार कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे सुमारे १,१२५.४० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या विभागात घनसावंगी उपविभाग ३६४.०८ कोटी थकबाकीसह आघाडीवर आहे. त्यानंतर अंबडमध्ये ३५४.७५ कोटी, परतूर २१२.५५ कोटी, तर मंठा उपविभागात १९४.०२ कोटी थकबाकी नोंदविण्यात आली आहे.
राज्य सरकारने साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी ग्राहकांची वीज थकबाकी माफ करण्याची घोषणा केल्याने जालना जिल्ह्यातील लाखो रुपयांच्या नव्हे तर हजारो कोटी रुपयांच्या थकबाकीचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जालना जिल्ह्यात कधी कोरडा तर कधी अतिवृष्टीने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीनंतर कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या मोठ्या थकबाकीचा लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आगामी काळात कृषिपंपाना सुरळीत वीज पुरवठा करून महावितरणने सहकार्य करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने साडेसात एचपीपर्यंत कृषिपंपांची थकबाकी माफ करण्याची घोषणा केली असली तरी अद्यापपर्यंत याचा अध्यादेश महावितरणकडे आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जीआर आल्यानंतर महावितरणच्यावतीने साडेसात एचपीपर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांची वीज बिले माफ करण्याची कार्यवाही करण्यात येईल.