जालना

Jalna accident | जाफ्राबाद-चिखली रोडवर भीषण अपघात; कारला आग लागून तरुणाचा होरपळून मृत्यू

भरधाव वेगातील कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरात आदळली अन् कारने पेट घेतली

पुढारी वृत्तसेवा

जाफ्राबाद : जाफ्राबाद-चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात शनिवारी (दि. ३१) पहाटे भीषण अपघात होऊन कारला आग लागल्याने एका ३५ वर्षीय तरुणाचा गाडीतच होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृताचे नाव नितीन प्रभाकर गवळी (वय ३५, रा. रूपचंद नगर, जि. अकोला) असे आहे. ते आपल्या अल्टो कारने नाशिकहून अकोल्याकडे जात होते. पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास जाफ्राबाद-चिखली मार्गावरील जंजाळवाडी परिसरात त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरात आदळली.

धडक इतकी भीषण होती की, अपघातानंतर कारने तत्काळ पेट घेतला. दरम्यान, गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने किंवा धडकेमुळे कारचे नुकसान झाल्याने नितीन गवळी यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ते गाडीमध्येच अडकून पडले आणि आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांतच संपूर्ण कार जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस उपनिरीक्षक देव पवार, हेड कॉन्स्टेबल अनंता भुतेकर, पोलीस कर्मचारी विजय जाधव, ओम नागरे, अरुण वाघ तसेच चालक राम मोरे यांच्यासह फॉरेन्सिक व वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT