जालना: कॉम्प्युटर क्लासला जाते, असे सांगून घराबाहेर पडलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
फिर्यादी या आपल्या मुलांसह शहरातील एका वसाहतीत वास्तव्यास आहे. त्यांचे पती कामानिमित्त हैदराबाद येथे खासगी कंपनीत आहेत. दि. १९ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांची १४ वर्षांची मुलगी कॉम्प्युटर क्लासला जाते असे सांगून घराबाहेर गेली. मात्र ती घरी न परतल्याने आईने काळजीपोटी तिच्या क्लासमध्ये चौकशी केली. त्यावेळी मुलगी क्लासला आलीच नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.
मैत्रिणींकडे विचारपूस केली. रात्री उशिरापर्यंत वाट पाहूनही ती न आल्याने परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी आपल्या मुलीला पळवून नेल्याची फिर्याद आईने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली.
यावरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७(२) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रवी देशमाने करत आहेत.