जालना

Ashadhi wari 2026 Anwa jalana: मराठवाड्याची पंढरी अर्थात श्रीक्षेत्र आन्वा...; आषाढी वारीची अखंड भक्तिपरंपरा

मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेश तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविक या परंपरेशी श्रद्धेने जोडलेले आहेत

पुढारी वृत्तसेवा

सादिक शेख

आन्वा : या संतवचनाचा प्रत्यय देणारी, सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांची अखंड, प्रासादिक आणि भक्तिपूर्ण परंपरा आजही मराठवाड्यातील श्रीक्षेत्र आन्वा येथे अविरत सुरू आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वसलेले श्रीक्षेत्र आन्वा हे भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, ‘मराठवाड्याची पंढरी’ म्हणून ओळखले जाते.

इसवी सन १६३० मध्ये झाली पांडुरंग-रुक्मिणी मातेची स्थापना

इसवी सन १६३० मध्ये संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांनी श्रीक्षेत्र आन्वा येथे भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी मातेची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत येथे विठ्ठल-रुक्मिणी भक्तीची अखंड ज्योत तेवत आहे. संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांच्या या पुरातन वारकरी पीठाची परंपरा केवळ एका गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेश तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविक या परंपरेशी श्रद्धेने जोडलेले आहेत.

“पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थव्रत ॥” या उक्तीप्रमाणे गेल्या तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून या परंपरेतील धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम अखंड निष्ठेने, भक्तिभावाने आणि श्रद्धेने सुरू आहेत,येथे पावनी (जुई) नदीच्या काठावर संत सद्गुरू श्री विठोबादादा महाराज व संत सद्गुरू श्री गोपीनाथ महाराज यांचे समाधी मंदिरे आहेत.

सद्गुरु श्रीचातुर्मास्ये महाराजांची अखंड परंपरा

या परंपरेनुसार चातुर्मासातील चार महिने पूज्य महाराजांचे पंढरपूर येथे वास्तव्य असते. या काळात पंढरपूरची शिव ओलांडायची नाही, असा कठोर नियम पाळला जातो. पंढरपूर येथील मठामध्ये दररोज पहाटे काकडा, भागवत, हरिपाठ आणि सायंकाळी गादीवर विराजमान असलेल्या महाराजांचे कीर्तन, असा नित्यक्रम असतो. पंढरपूरमध्ये अनेक कीर्तन फडांच्या परंपरा आहेत; मात्र चातुर्मासातील चारही महिने नित्यनियमाने दररोज कीर्तनसेवा सुरू असलेली ही एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. कीर्तनातून संतचरित्र तसेच गोकुळाष्टमीनंतर भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगितले जाते. या परंपरेतील एक महत्त्वाचा दंडक म्हणजे कीर्तनामध्ये एकदा आलेला अभंग किंवा श्लोक पुन्हा घ्यायचा नाही. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान, संतचरित्र आणि नामस्मरण यांचा अखंड प्रवाह या परंपरेतून सुरू आहे.

‘चातुर्मास्ये’ नावामागील आख्यायिका

या परंपरेला ‘चातुर्मास्ये महाराज परंपरा’ हे नाव केवळ चातुर्मासातील चार महिने पंढरपूर येथे वास्तव्य केले म्हणून मिळालेले नाही. या नावामागे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची कृपा आणि एक अद्भुत परंपरागत आख्यायिका जोडलेली आहे. एका आषाढी यात्रेच्या वेळी एका वृद्ध भक्त महिलेने भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेला नारळ देवाच्या चरणाला चिकटून राहिला. अनेक प्रयत्न करूनही तो नारळ निघेना. त्यानंतर तत्कालीन पुजारी बडवे यांच्या स्वप्नात भगवान पांडुरंगाने दृष्टांत देऊन सांगितले की, हा नारळप्रसाद संत विठोबा दादा चातुर्मास्ये यांचा आहे. त्यानंतर पूज्य दादामहाराजांनी उपरणे पसरून भगवंतासमोर उभे राहताच तो नारळ भगवंतांनी त्यांच्या पदरात टाकला. त्या दिव्य प्रसंगानंतर गादीवर विराजमान असलेल्या वंशजांचे आडनाव ‘चातुर्मास्ये’ झाले, अशी या परंपरेतील श्रद्धा आहे.

नामस्मरण हीच साधना

“बोलावा विठ्ठल । चालावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवेभावे ॥”

हा या परंपरेचा मुख्य विचार आहे. श्रीविठ्ठल भक्ती आणि नामस्मरणाला या परंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूज्य महाराजांसह असंख्य गुरुभक्त अखंड विठ्ठलनामात तल्लीन असतात. गावोगावी आणि घरोघरी श्रीविठ्ठल नामजपाचे कार्यक्रम सातत्याने सुरू असतात. पुराणांमध्ये तसेच वारकरी संप्रदायामध्ये सांगितल्याप्रमाणे, कलियुगामध्ये भक्तीचे श्रेष्ठ आणि सर्वांना सहज साध्य होणारे साधन म्हणजे नामस्मरण. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव आणि वैचारिक अस्वस्थता वाढलेली असताना मन स्थिर ठेवण्यासाठी नामचिंतन हे अत्यंत सोपे आणि प्रभावी साधन आहे. म्हणूनच प्रत्येक भक्ताने दररोज किमान ११ माळा विठ्ठल नामजप करावा, असा या परंपरेतील दंडक आहे. या परंपरेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या उपासनेवर निष्ठा ठेवताना दुसऱ्याच्या उपासनेबद्दल किंवा परंपरेबद्दल कधीही आकस अथवा कमीपणा बाळगला जात नाही. उलट, प्रत्येक संतपरंपरेप्रती आदर आणि नम्रता राखली जाते. अंधश्रद्धा, जादूटोणा यांसारख्या गोष्टींना या परंपरेत कोणतेही स्थान नाही. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना भक्तीच्या मार्गावर समान स्थान दिले जाते.

संतपरंपरेचे वार्षिक धार्मिक उपक्रम

या परंपरेत वर्षभर विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि भक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. चातुर्मासानिमित्त पंढरपूर येथे चार महिन्यांचे वास्तव्य, आळंदी येथे संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम, पैठण वारी, मुक्ताई वारी तसेच माघ महिन्यात श्रीक्षेत्र आन्वा येथे भगवान पांडुरंगाचा रथउत्सव हे या परंपरेचे प्रमुख वार्षिक सोहळे आहेत. याशिवाय विविध भागांमध्ये संतपरंपरेचे, नामस्मरणाचे आणि भक्तिप्रसाराचे कार्यक्रम वर्षभर सुरू असतात.

प्रत्येक शुद्ध एकादशीला भरते श्रीक्षेत्र आन्वा येथे वारी

संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराजांनी श्रीक्षेत्र आन्वा येथे भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी मातेची स्थापना केल्यापासून आजतागायत भाविक मोठ्या श्रद्धेने श्रीक्षेत्र आन्वा येथे येत आहेत. वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला श्रीक्षेत्र आन्वा येथे वारी भरते. महाराष्ट्राच्या विविध भागांसह मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेश आदी भागांतून भाविक पायी, वाहनाने किंवा जसे शक्य असेल तसे श्रीक्षेत्र आन्वा येथे येऊन भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि आईसाहेब रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात. प्रत्येक शुद्ध एकादशीला श्रीक्षेत्र आन्वा येथे भक्ती, नामस्मरण आणि विठ्ठलनामाचा गजर अनुभवायला मिळतो. त्यामुळे वर्षातील प्रत्येक महिन्याला श्रीक्षेत्र आन्वा येथे पंढरीसारखे भक्तिमय वातावरण निर्माण होते.

आषाढी एकादशीला आनव्यात भरते भक्तीची पंढरी

विशेषतः आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेपासूनच भगवान श्री पांडुरंग परमात्मा, आईसाहेब रुक्मिणी माता त्याचं बरोबर संत सद्गुरू श्री विठोबादादा महाराज संत सद्गुरू श्री गोपीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. श्री संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पहाटे अभिषेक व आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी दिंडी सोहळा, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन अशा भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होतो. या दिवशी श्रीक्षेत्र आन्वा येथे येणारा प्रत्येक भाविक जणू पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचा अनुभव घेतो. म्हणूनच श्रीक्षेत्र अनवा हे भाविकांसाठी केवळ एक तीर्थक्षेत्र नसून, ‘मराठवाड्याची पंढरी’ आहे.

संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांनी इसवी सन १६३० मध्ये श्रीक्षेत्र अनवा येथे भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी मातेची स्थापना करून सुरू केलेली ही भक्तिपरंपरा आजही अखंड सुरू आहे. या पुरातन परंपरेचे विद्यमान पीठाधीश परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संस्थानचा सर्व कार्यभार परंपरेनुसार आणि भक्तिभावाने चालत आहे. परमपूज्य सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चातुर्मास्ये यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीविठ्ठल भक्ती, नामस्मरण, संतपरंपरा आणि विविध धार्मिक उपक्रमांची ही अखंड परंपरा पुढे नेली जात आहे. शेकडो वर्षांचा काळ लोटला, अनेक पिढ्या बदलल्या, काळ बदलला; मात्र श्रीविठ्ठल नामावरील श्रद्धा आणि भक्तीची ही अखंड परंपरा आजही तितक्याच निष्ठेने पुढे चालत आहे.

भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा अखंड प्रवाह

संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराजांनी सुरू केलेली ही भक्तिपरंपरा आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे आणि आध्यात्मिक आधाराचे केंद्र बनली आहे. विठ्ठल नामाचा गजर, संतपरंपरेचा आधार आणि भक्तीची अखंड ज्योत अशी श्रीक्षेत्र अनवा येथील ही परंपरा आजही महाराष्ट्राच्या संतभूमीत भक्तीचा प्रकाश पसरवत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या दिशेने निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या पावलांबरोबरच, मराठवाड्याच्या या पवित्र भूमीतही विठ्ठलनामाचा जयघोष दुमदुमतो. म्हणूनच श्रीक्षेत्र आन्वा म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नव्हे; तर संतपरंपरेने, नामस्मरणाने आणि अखंड विठ्ठलभक्तीने पावन झालेली मराठवाड्याची पंढरी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT