सादिक शेख
आन्वा : पावसाळ्यातील दोन महिन्याचा कालावधी संपत आला तरी आन्वा परिसरात अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागातील साठवण पाझर तलाव, नाले अद्याप कोरडेठाक असून, सद्यस्थितीत तलावांत केवळ जनावरांना पिण्यापुरता पाणी नसल्याने जनावरांच्या पिण्याचा प्रश्न गंभीर होणार आहेत.
पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटत आला तरी देखील भोकरदन तालुक्यातील लहान, मोठी धरणे व तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. लघु प्रकल्प मृत साठ्यात आहेत तर, मध्यम प्रकल्प व सिंचन तलाव कोरडे ठाक असून, यंदाच्या पावसाळ्यात तरी ते भरणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला असून यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
यंदा मृग नक्षत्र कोरडा गेला असून आद्रा नक्षत्रात हलकासा पाऊस झाल्यानंतर दिड महिन्यात पेरणीलायक पाऊस पडला आणि शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. त्याच ओलीवर पेरलेले बी उगवले पण सध्या दमदार पाऊस न झाल्याने या भागातील साठवण तलाव पाण्याअभावी कोरडे ठाक पडले असून विहिरीचा पाणीसाठा अद्याप वाढला नाही. अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. त्यातच यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भविष्यामध्ये बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. त्याच बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नही गंभीर होणार आहे.