जाफराबाद ः तालुक्यातील पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्या आणि उघड झालेल्या प्रकरणांमुळे प्रशासनाचा कारभार पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी घरकुल योजनेचे हप्ते व विहिरीच्या कामांचे मस्टर प्रलंबित राहिल्याने गोरगरीब लाभार्थ्यांना मोठा फटका बसत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गट विकास अधिकारी नारायण खिल्लारे यांची अचानक बदली झाल्यानंतर सहायक गट विकास अधिकारी देविदास मगर यांनी कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या काळात काही प्रमाणात कामकाज सुरळीत होत असतानाच विस्तार अधिकारी चव्हाण यांच्यासमोर घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण उघड झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणानंतर मगर यांच्याकडील कार्यभारही काढून घेण्यात आला. यानंतर भोकरदन येथील गट विकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेनिकर यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला. मात्र, संबंधित अधिकारी पंधरा ते वीस दिवसांत केवळ दोन-तीन वेळाच भेट देत असल्याने प्रत्यक्ष कामकाजावर परिणाम होत आहे.
दरम्यान, घरकुल योजनेचे हप्ते अडकले असून विहिरीच्या कामांचे मस्टरही प्रलंबित आहेत. लाभार्थ्यांना वारंवार पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत असून “ना अधिकारी, ना निर्णय” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सततच्या प्रशासकीय गोंधळामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, तातडीने हस्तक्षेप करून कायमस्वरूपी गट विकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रभारी म्हणून कार्यरत असून भोकरदन तालुक्याची जबाबदारी जाफराबादपेक्षा मोठी असल्याने पूर्ण वेळ देणे शक्य होत नाही. तरीही दोन्ही तालुक्यांतील कामकाज सुरळीत राहावे यासाठी आवश्यक त्या सूचना व समन्वय ठेवला जात आहे. -श्रीकृष्ण वेणीकर, प्रभारी गटविकास अधिकारी
सामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयात जावे लागत आहे. मात्र अधिकारीच उपलब्ध नसल्याने कामे होत नाहीत. हा प्रकार गंभीर असून वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देऊन कायमस्वरूपी अधिकारी नेमावा, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”संजय राठोड, माजी सरपंच, अकोलादेव