जाफराबाद : शेतकऱ्यांच्या कामासाठी गटविकास अधिकारी आणि निलंबित विस्तार अधिकारी या दोघांनी पैसे जमा केल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नसल्याच्या निषेधार्थ बळीराजा फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी जाफराबाद शहरात शुक्रवार, 13 रोजी भीक मांगो आंदोलन केले. यावेळी जमा झालेले 257 रुपये तहसीलदारांच्या टेबलवर ठेवून गटविकास अधिकाऱ्यांचा निषेध नोंदविला.
तहसीलदार अविनाश लोंढे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. ती रक्कम तहसीलदारांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ती रक्कम जमा करणार असल्याचे सांगितले.
दिलेल्या निवेदनात गटविकास अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, कामात दिरंगाई, अनियमितता, गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कामाचे दर ठरविले असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, असा इशारा देण्यात आला आहे.