जाफराबाद : अकोलदेव येथील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून बनविलेला पाणंद रस्ता.  pudhari photo
जालना

Jalna News: शासकीय अनास्थेला शेतकऱ्यांची चपराक

अकोलादेवच्या बळीराजाने श्रमदानातून उभारला ३ किमीचा पाणंद रस्ता !

पुढारी वृत्तसेवा

जाफराबाद : शासन आणि प्रशासनाच्या उदासीन कारभाराला कंटाळून अखेर अकोलादेव येथील शेतकऱ्यांनी एकीचे बळ दाखवत स्वतःचा रस्ता स्वतःच तयार केला आहे. बुटखेडा रोड ते गणपती मंदिर दरम्यानचा तब्बल ३ किलोमीटर लांबीचा पाणंद रस्ता शेतकऱ्यांनी लोकसहभाग आणि श्रमदानातून पूर्ण केला आहे. "सरकार देत नाही आणि प्रशासन ऐकत नाही" अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणावर सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शासनाकडून शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्यांसाठी 'पाणंद रस्ते योजना' राबवली जात असल्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, अकोलादेव येथील डाक बंगला बुटखेडा रोड ते गणपती मंदिर या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली होती. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणेही कठीण होत असल्याने शेतकऱ्यांना पिके बाजारात नेणे आणि शेतात जाणे अशक्य झाले होते.

हा रस्ता मंजूर व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी अनेक महिने शासन दरबारी शेकडो खेटे मारले. परंतु, अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे या योजनेचा कोणताही लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. अखेर शासनाची ही योजना नुसतीच नावाला उरल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाकडून वारंवार निराशा पदरी पडल्याने, शेतकऱ्यांनी कोणावरही अवलंबून न राहण्याचा निर्धार केला.

गावातील सर्व शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी श्रमदानाचा निर्णय घेतला. स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून, ट्रॅक्टर आणि आवश्यक साधनांची सोय करत शेतकऱ्यांनी दिवस-रात्र घाम गाळला. खडी, मुरूम टाकून अत्यंत कमी वेळात हा ३ किलोमीटरचा पानंद रस्ता वहिवाटीसाठी योग्य केला.

निधी जातो कुठे ?

शेतकऱ्यांनी श्रमदानातून रस्ता पूर्ण केल्याची बातमी परिसरात पसरताच प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. जर शेतकरी स्वतःच्या हिमतीवर रस्ते बनवू शकतात, तर मग शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी जातो कुठे? आणि 'पाणंद रस्ते योजने'च्या नावाखाली होणारा खर्च नेमका कोणाच्या खिशात जातो? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

लोकप्रतिनिधींपासून ते सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवले. पण कोणीही आमच्या समस्येकडे लक्ष दिले नाही. दरवर्षी पावसाळ्यात होणारे हाल थांबवण्यासाठी आम्ही स्वतःच रस्त्याचे काम करण्याचे ठरवले. शासनाने फक्त कागदावर योजना चालवण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर काम करावे."
दत्तू सवडे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT