

टेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या पावसामुळे चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टेंभुर्णी कृषी मंडळ परिसरात मंगळवारी (दि.२१) सकाळपासूनच रिमझिम पावसाने सुरुवात झाली. या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यापासून ढग जमा होऊनही पाऊस न पडल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आणि मका पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र आज पहाटेपासूनच आकाशात काळे ढग दाटून आले आणि सकाळी ८ च्या सुमारास हलक्या सरींनी हजेरी लावली. दुपारपर्यंत हा रिमझिम पाऊस अधूनमधून सुरूच होता.
या पावसामुळे ओल नसल्याने रखडलेली पेरणी आणि दुबार पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. नुकतीच उगवलेली सोयाबीन आणि कपाशीची रोपे या पावसामुळे तजेलदार झाली आहेत. तसेच शेतातील ओल टिकून राहिल्याने खते आणि औषध फवारणीसाठीही शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
पावसाच्या आगमनाने गावातील वातावरणही गार झाले आहे. शेतकरी बांधवांनी शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. बैल, जुपून कोळपणी ला आनंदाने पुन्हा शेतात सज्ज झाले आहेत. महिला भगिनींनीही अंगणात पाऊस पडल्याचा आनंद व्यक्त केला. हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस असाच हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळाला आहे.
गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले असे चित्र स्पष्ट झाले होते. परंतु मंगळवारी (दि.२१) सकाळपासूनच रिमझिम पाऊसला सुरुवात झाली यामुळे दुबार संकट टळले.
राजू डाहाळे, शेतकरी पापळ
गोल्ड लोन घेऊन खरिप हंगामाची पेरणी करण्यात आली आहे. यात मोठा खर्च झाला असून निसर्गाने पुन्हा एका अवकृपा दाखविली आहे. पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओठवले होते. परतू मंगळवारी झालेल्या पावसाने तूर्तास दुबार पेरणीचे संकट टळले.
विनायक ढवळे, शेतकरी