Interviews of interested candidates by Uddhav Thackeray Sena
परतूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती परतूर शहरात घेण्यात आल्या.
जिल्हाप्रमुख महेश नळगे यांच्या परतूर येथील संपर्क कार्यालयावर संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतीताई ठाकरे, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, माजी आमदार सुरेश सांबरे, जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर, महेश नळगे, माधवराव कदम, प्रदीप बोराडे, युवासेना जिल्हा प्रमुख गणेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने मुलाखतींना हजेरी लावली. राज्यात पावसाने शेतकऱ्यांचे बेहाल केले असून शेतकऱ्यांची चेष्टा करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्यातील महायुतीचे सरकार करत आहे.
शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांबाबत शिवसेना कायम संवेद-नशील असून सरकारला वेळोवेळी जाब विचाराचे काम शिवसेनेने केले आहे. जनतेच्या मनात सरकारबद्दल प्रचंड रोष असून हा रोष मतपेटीच्या माध्यमातून निश्चितपणे व्यक्त होईल. सरकारचे नाकर्तेपण जनतेसमोर मांडून शिवसेनेचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे असे आवाहन यावेळी संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले.
जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतीताई ठाकरे, उपनेते लक्ष्मण वडले, जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आदींनी यावेळी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले.