

Manoj Jarange: Take Dhananjay Munde's narco test with me
जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन माझी व मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करण्याचे आव्हान दिले होते. धनंजय मुंडे यांचे हे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवार (दि.८) जालना अप्पर पोलिस अधीक्षकांना पत्र देत आपल्यासह धनंजय मुंडे व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली.
हत्येचा कट समोर आल्यानंतर मनोज जरांगे व धनंजय मुंडे यांच्यातील वाद तीव्र होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी या कटाची सत्यता समोर आणण्यासाठी आपल्यासह मनोज जरांगे आणि आरोपींचीही नार्को टेस्ट करावी, असे आव्हान जरांगें यांना दिले होते. मुंडेच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेचे आव्हान स्वीकारले.
शनिवारी जरांगे यांनी पोलिस अधीक्षकांच्या नावे पत्र लिहून हत्येच्या कटाची सत्यता समोर येण्यासाठी मी स्वतः नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझ्यासह धनंजय मुंडे आणि आरोपींचीही नार्को टेस्ट करण्यात यावे, अशी मागणी केली. शनिवारी अंतरवाली सराटी येथून आलेल्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांना जरांगेचे हे पत्र दिले. याप्रसंगी शिष्टमंडळात अंतरवालीचे सरपंच पांडुरंग तारख, किशोर मरकड, संजय कटारे, विक्रम देशमुख यांची उपस्थिती होती. मनोज जरांगे यांनी नार्को टेस्टची तयारी दर्शविल्याने आता धनंजय मुंडे याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
क्रिमिनल माइंडच्या लोकांची नावे समोर येतील
नार्को टेस्टमुळे क्रिमीनल माइंडच्या लोकांची नावे समोर येतील, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. मनोज जरांगे म्हणाले की, या नार्को टेस्टमुळे संतोष देशमुख महादेव मुंडे, गितेसह इतर प्रकरणातील क्रिमिनल माइंडच्या लोकांची नावे उघडकीस येतील. 'कर नाही त्याला डर कशाला', घातपात घडवून आण्याचा तसेच खुनाचा क्रूरपणे कट रचणे असे प्रकार या टेस्टमधून समोर येतील. वाद व वैर नसताना जिवावर उठला आहे.
आमचेच लोक हाताखाली धरून त्यांचा आमच्या विरोधात वापर केला जात आहे. आरोपी तुमचेच लोक असल्याचे सांगून वर खोटे बोलायचे. त्याने आयुष्यभर हेच काम केले. लोक तर मारायचे मात्र कळू द्यायचे नाही. म्हणून तुझी खोडच मोडायची असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. महादेव मुंडे खून प्रकरणातही धनंजय मुंडे सर्वांची नार्को टेस्ट करावी 'दूध का दूध पाणी का पाणी' होईल नुसतं एकाची मान्य नसल्याचे ते म्हणाले.