सुखापुरी ः अंबड तालुक्यातील रुई ते सुखापुरी या महत्त्वाच्या रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे साईड पंखे (माती भरणे) अद्यापही अपूर्णच असल्याने वाहनधारक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले. मात्र रस्त्याच्या कडेला आवश्यक त्या प्रमाणात मुरूम व माती टाकून साईड पंखे मजबूत करण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे निर्माण झाले असून वाहन खाली घसरण्याचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शाळकरी विद्यार्थी आणि रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पावसाळा तोंडावर आलेला असताना ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कडेला माती नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्याखाली जाऊन डांबरीकरण उखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिल उचलण्याची घाई करण्यात आली; मात्र प्रत्यक्षात साईड पंख्यांचे काम अपूर्णच ठेवण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी न केल्यामुळे ठेकेदाराचे चांगलेच फावले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोलगट भाग तयार झाल्यामुळे चारचाकी वाहनांना रस्ता देताना मोठी अडचण निर्माण होत आहे. एखादे वाहन खाली घसरल्यास गंभीर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. यापूर्वीही काही दुचाकी किरकोळ घसरल्याच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
आंदोलनाचा इशारा
रुई-सुखापुरी मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नागरिकांचा या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात प्रवास असतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून संबंधित ठेकेदाराकडून अपूर्ण साईड पंख्यांचे काम पूर्ण करून घ्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.