शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाच्या मुंबई, नागपूर विभागांच्या पथकांनी जालन्यातील चार व्यापारी, उद्योजकांच्या आस्थापना, घरांवर धाडी टाकल्या आहेत. जवळपास 20 ते 25 वाहनांतून आयकर विभागाचे अधिकारी जालन्यात दाखल झाले होते.
कर चुकवणाऱ्यांच्या थरकाप उडवणारी मोठी कारवाई जालन्यात पार पडली आहे. काल 30 ऑक्टोबरच्या भल्या पहाटे मुंबई आणि नागपूर येथील आयकर विभागाच्या पथकांनी जालन्यातील 5 ते 6 नामांकित व्यापारी व उद्योजक तसेच ट्रान्सपोर्ट बियाणे उद्योगासह कपडे, सराफा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचा घरांवर आणि आस्थापनांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या धाडीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती आहे.
या कारवाईसाठी सुमारे 20 ते 25 वाहनांतून अधिकारी जालन्यात दाखल झाले, आणि शहरभरात एकच खळबळ उडाली. धाडीमुळे कर चुकविणाऱ्यांचे व अघोषित संपत्ती असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टील, बियाणे उद्योग, ट्रान्सपोर्ट, कपडे, सराफा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उलाढाल असून, काही व्यापाऱ्यांनी कर भरणा टाळल्याचा संशय होता. आयकर विभागाने यापूर्वीही जनजागृती मोहीम राबवून कर भरण्याचे आवाहन केले होते, परंतु काहींनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले.
या धाडीमुळे जालन्यातील व्यापार व उद्योगवर्गात दिवसभर चर्चेचा विषय बनला होता. उशिरापर्यंत तपास सुरू असल्याने अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र या धाडीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहेत.