Income of Rs 3 lakhs in two acres, papaya garden flourishes in hilly fields
अविनाश घोगरे
घनसावंगी : जिद्द मेहनत आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर निश्चितपणे आपण प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अनुकूलता निर्माण करू शकतो. शेतीमध्ये आव्हाने नव्यानेच नसतात; पण जिद्द, मेहनत, चिकाटी आणि योग्य तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर प्रतिकूल परिस्थितीतही यशाची नवीन शिदोरी बांधता येते. देवी दहेगाव येथील युवा शेतकरी बाळू ठाकरे यांनी दगडी, ओसाड आणि कोरडवाहू डोंगर माथेरानवर समृद्ध पपई बाग फुलवून दाखवली आहे. कठीण परिस्थितीतही यश मिळवता येते, याचा धडा त्यांच्या कार्यातून मिळतो. त्यांनी तब्बल दोन एकरांत तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
माळरानावरील जमीन पाण्याअभावी आणि मातीच्या अनुकूलतेअभावी शेतीसाठी अयोग्य मानली जाते. मात्र बाळू ठाकरे यांनी आव्हान स्वीकारत दोन एकर क्षेत्राची निवड केली आणि सोलापूरहून १५ या नंबर प्रजातीच्या सुमारे २ हजार पपई रोपे आणून लागवड केली. रोपांची संवेदनशीलता आणि पहिल्या तीन महिन्यांमधील अत्यंत काळजीपूर्वक व्यवस्थापन पिकासाठी अत्यावश्यक असते. अशा परिस्थितीत ठाकरे यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. विहिरीतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत रोपांचे सुयोग्य संगोपन करण्यात आले.
कठोर परिश्रम आणि योग्य व्यवस्थापनाच्या जोरावर अवघ्या आठ महिन्यांत बाग फुलून आली. पपईची झाडे मजबूत वाढू लागली आणि फळधारणा मोठ्या प्रमाणात झाली. सध्या झाडांवर फळांचा भरघोस भार आहे. हा प्रदेश डोंगराळ असून पावसाचे प्रमाण कमी आहे. तरीही येथे फळबाग उभी राहिल्याने परिसरातील शेतकरी आश्चर्यचकीत आहेत. आतापर्यंत बागेची चार वेळा तोडणी झाली असून व्यापाऱ्यांकडून मागणी चांगली मिळत आहे. बाजारभावाचा अंदाज बाळगता कधी दहा रुपये किलो तर कधी सहा रुपये किलो दर मिळाला. जरी भावात चढ-उतार असले तरी पपईचे उत्पादन जास्त असल्याने आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना लाभ होत आहे. ठाकरे यांनी आतापर्यंत झालेल्या विक्रीतून जवळपास ३ लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
उत्पन्न वाढेल
या संपूर्ण प्रकल्पावर सुमारे एक लाख रुपये खर्च झाला, रोपे, ठिबक व्यवस्था, मजुरी, खतऔषधे या सर्वांचा विचार करता उत्पादन खर्चानुसार मिळणारा नफा लक्षणीय आहे. "सध्या बाजारात दर कमी आहेत. पुढे दर चांगले मिळाले तर उत्पन्न आणखी वाढेल," असे बाळू ठाकरे सांगतात.
प्रयोग यशस्वी
या भागात यंदा ओला दुष्काळ पडला. कापूस, सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांचे गंभीर नुकसान झाले. अशा वेळी नावीन्यपूर्ण विचार, धाडस आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर पपईसारखे फळपीक घेऊन केलेला हा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे.
माथेरानवर पाण्याची टंचाई, मातीची कमतरता आणि नेहमीची असणारी प्रतिकूलता असूनही आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या मदतीने यश मिळवता येते, याची ही जिवंत साक्ष आहे. युवा पिढी आदर्श घ्यावा