Include Banjara community in ST category: Kailash Gorantyal
जालना, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा विभागातील बंजारा (लमाण) समाजाला मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, मराठवाडा हा प्रदेश सन १९४८ पर्यंत निजाम शाशित हैदराबाद राज्याचा भाग होता. त्या काळातील हैदराबाद गॅझेटियर १९२० मध्ये लांबडा बंजारा (सुगळी) समाजाचा स्पष्ट उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून केलेला आहे.
बंजारा (लमाण) समाज मराठवाडा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून गॅझेटमधील उताऱ्यातील पुराव्यानुसार बंजारा समाज हा ऐतहासिक दृष्ट्या व प्रशासकीय नोंदीनुसार आदिवासी समाजामध्ये आहे. तथापी मराठवाड्याचा भाग महाराष्ट्रात सामील झाल्यानंतर सन १९५६ नंतर या समाजाला ओबीसी एनटीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले.
परंतु तेलंगणा व आंध्र प्रदेशात याच गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे. मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या झालेल्या आंदोलनानंतर शासनाने मराठा समाज बांधवांना २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार हैदराबाद गॅझेटियर लागू केले.
शासन स्तरावर हैदराबाद गॅझेटियर अधिकृतपणे स्वीकारले व अंमलात आले असल्यामुळे त्याचा आधार घेऊन मराठवाड्यातील बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात सामील करून त्यांना या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.