जालना: राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींनी वेग घेतला असून, जालना जिल्ह्यावर पुढील काही दिवस निसर्गाचे मोठे संकट घोंगावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जारी केलेल्या ताज्या पत्रकानुसार, जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस तीव्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
बुधवार, दि. (3) जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 3 जून रोजी ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहणार असून,, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दि. 4 व 5 रोजी पावसाचा जोर काहीसा ओसरेल, मात्र तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ हवामान राहील. दि. 6 रोजी हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे. या अवकाळी आणि वादळी पावसामुळे उन्हाळी काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
वेगवान वाऱ्यामुळे कमकुवत घरे, झाडे आणि वीजवाहिन्या कोलमडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही भागांत तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
ही घ्या काळजी
वीज चमकत असताना किंवा वादळ असताना मोठ्या झाडांखाली किंवा कच्च्या बांधकामाच्या आडोशाला उभे राहू नका. वादळाच्या वेळी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग काढून ठेवावेत. आपल्या पाळीव प्राण्यांना व जनावरांना गोठ्यात किंवा सुरक्षित सुरक्षित छपराखाली बांधावे, उघड्यावर सोडू नये. प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.