जाफराबाद ः तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करत दोन स्वतंत्र फिर्यादींवरून गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी 18 जानेवारी मध्यरात्री 12 वाजता आरतखेडा ते वरखेडा गावाच्या दरम्यान अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार मंगेश दशरथ साबळे (वय 30) यांनी कारवाई केली. चार ब्रास वाळू (अंदाजे किंमत 12 हजार रुपये) वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई सुरू असताना आरोपींनी संगनमत करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
टिप्पर पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण केला व टिप्पर पळवून नेला. या प्रकरणी साईनाथ श्रीरंग भोपळे (रा. देऊळझरी), शुभम ठेग (रा. जवखेडा ठेग), दीपक डोळे (रा. आरदखेडा), टिप्पर चालक तसेच 7 ते 8 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना याच दिवशी रात्री 11 वाजता देऊळझरी शिवारातील धामणा नदीपात्रालगत घडली. या प्रकरणी तलाठी गजानन वामनराव भालके (36) यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळी विना नंबरची अंदाजे 30 लाख रुपये किमतीची पिवळ्या रंगाची आढळून आली. या बकेटमध्ये व परिसरात ठिकठिकाणी वाळू आढळून आली. कैलास हाडगे (35) व आकाश गावंदे (रा. देऊळगाव उगले, ता. जाफराबाद) यांनी संगनमत करून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन करून शासनाचा महसूल बुडविला तसेच पळवून नेऊन शासकीय कामात अडथळा केला, असा आरोप आहे.