Illegal moneylender returns over 57 hectares of seized property to borrowers.
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात अवैध सावकारीचे जाळे अधिकच घट्ट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अवैध सावकाराने हडप केलेल्या ५७हेक्टरांहून अधिक मालमत्ता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने केलेल्या कारवाईमुळे कर्जदारांना परत देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, शेतकरी, मजूर, कष्टकरी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक मोठ्या प्रमाणावर खासगी सावकारांच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे अवैध सावकारी संदर्भात तब्बल ६३३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
यापैकी ५८९ प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यात आली असून ५७ प्रकरणांत तथ्य आढळले आहे. दोषी आढळलेल्या १६ सावकारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान अवैध सावकारांकडून ५७ हेक्टर ६५ आर मालमत्ता संबंधित कर्जदारांना परत मिळवून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार बोराडे यांनी दिली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी परवाना नसलेल्या सावकारांकडून अवाजवी व्याजद राने कर्जवाटप सुरू असल्याचे समोर आले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीच्या पैशाची गरज असल्याने ते सावकारांकडे वळत असून नंतर व्याजाच्या विळख्यात अडकत असल्याचे वास्तव आहे.
अवैध सावकारीविरोधातील कारवाईत परतूर तालुका सर्वाधिक आक्रमक ठरला आहे. येथे प्राप्त ४६ तक्रारींपैकी १५ प्रकरणांत तथ्य आढळले असून ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १५ हेक्टर ५३ आर मालमत्ता कर्जदारांना परत मिळवून देण्यात आली आहे.
घनसावंगी तालुक्यात ४५ तक्रारींपैकी ८ प्रकरणांत तथ्य आढळून १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंठा तालुक्यात ५५ तक्रारींपैकी ७ प्रकरणांत तथ्य आढळले असून ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबड तालुक्यात ७९ तक्रारी प्राप्त झाल्या असताना केवळ ३ प्रकरणांत तथ्य आढळले व १ गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बदनापूर तालुक्यात ६३ तक्रारी असूनही फक्त एका प्रकरणात तथ्य आढळले असून एकही गुन्हा दाखल झालेला नाही. तर भोकरदन तालुक्यात ६२ तक्रारींपैकी केवळ २ प्रकरणांत तथ्य आढळल्याचे समोर आले आहे.
जालना तालुक्यात तक्रारींचा उच्चांक
जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीत जालना तालुका सर्वाधिक प्रभावित असल्याचे समोर आले आहे. येथे अवैध सावकारीच्या २२२ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २०५ प्रकरणांची चौकशी पूर्ण झाली असून १३ प्रकरणांत तथ्य आढळले आहे. या प्रकरणांमध्ये ११ अर्जावर आदेश देण्यात आले असून १ हेक्टर ५ आर मालमत्ता संबंधितांना परत मिळवून देण्यात आली आहे. तसेच २ गुन्हेही दाखल करण्यात आले.
९४ वैध सावकार
जिल्ह्यात अधिकृतरित्या परवानगी घेऊन सावकारी करणारे एकूण ९४ वैध सावकार आहेत. यातही सर्वाधिक सावकार जालना तालुक्यात आहेत. त्याखालोखाल घनसावंगी, परतूर, बदनापूर तालुक्यात भोकरदन तालुक्यात फक्त एकच वैध सावकार आहे.
जालना जिल्ह्यातील अवैधरित्या सावकारी करणाऱ्या सावकारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारींची सत्यता पडताळली जाते.संजयकुमार बोराडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था