Horrific Accident on Jafrabad-Jalna Road: Teacher Dies, One Seriously Injured
जाफ्राबाद, पुढारी वृत्तसेवा :
जाफ्राबाद-जालना रोडवरील सावंगीगोधनखेडा फाट्याजवळ रविवारी (दि.२२) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णी येथील विनोद बाबुराव कळंबे (४४) हे (एम.एच.२१ बी.क्यू. ९५९५) या कारने टेंभुर्णीकडून जाफ्राबादकडे येत होते. तर रामेश्वर नामदेव पवार (४५) हे कारने (एम.एच.२८ ई.डब्ल्यू. ४३२६) जाफ्राबादकडून देऊळगाव राजाकडे जात होते. सावंगीगोधनखेडा फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात हलविले. गंभीर जखमी झालेल्या विनोद कळंबे यांना पुढील उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कळंबे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. विनोद कळंबे हे जाफ्राबाद तालुक्यातील नळवीरा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांचे लहान भाऊ होते. दरम्यान, या अपघाताची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.