घनसावंगी : सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले असून, त्यासोबतच समाजात स्वार्थ, लालसा आणि गैरप्रवृत्ती वाढताना दिसत आहेत. मात्र अशाच परिस्थितीत शिंदखेड गावात प्रामाणिकपणा, सचोटी आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.
शिंदखेड येथील सीताबाई बद्रीनारायण आधुडे यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची मौल्यवान सोन्याची पोत अज्ञात कारणाने हरवली होती. सोन्याचे वाढते दर लक्षात घेता ही घटना आधुडे कुटुंबीयांसाठी मोठ्या चिंतेची ठरली होती. पोत हरवल्याची माहिती गावात समजताच तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. दरम्यान, ही सोन्याची पोत गावातील तरुण सौरभचाबुकस्वार यांना सापडली.
आजच्या काळात इतकी मौल्यवान वस्तू सापडल्यावर अनेक जण मोहाला बळी पडतात; मात्र सौरभ यांनी प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारत कोणताही स्वार्थ न ठेवता सदर पोत नेमकी कोणाची आहे, याची खातरजमा करण्यासाठी गावात चौकशी केली. संपूर्ण माहिती पडताळून पाहिल्यानंतर त्यांनी ही सोन्याची पोत सीताबाई बद्रीनारायण आधुडे यांना सुरक्षितपणे परत केली. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे आधुडे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. त्यांनी सौरभ चाबुकस्वार यांचे आभार मानत त्यांच्या प्रामाणिकपणाचे आणि सामाजिक भानाचे कौतुक केले.
प्रेरणा घ्यावी
या घटनेमुळे शिंदखेड गावात समाधानाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या महागाईच्या आणि स्पर्धेच्या युगातही प्रामाणिकपणा व नैतिक मूल्ये टिकून आहेत, याचे दर्शन या घटनेतून घडले आहे. विशेषतः तरुण पिढीने सौरभचाबुकस्वार यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.