घनसावंगी (जालना) : घनसावंगी तालुक्यात सोमवारी (दि.21) रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील खडकी, नारोळा, मुसा-भद्रायणी नदींला मोठे पूर आले. जोरदार पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. जोरदार पावसामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
घनसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागे अतिवृष्टीचा फेरा लागला आहे. १६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुन्हा सोमवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला. यापूर्वी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा शेतात निचरा झाला नसताना पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पाच दिवसांत दुसऱ्यांदा मुसळधार पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्यातील नारोळा नदी, खडकी नदी, मुसा भद्रायनी नदी दुथडी
भरून वाहल्याने पुन्हा यामार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. तालुक्यात खरीप हंगामात ९० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाची पिके अक्षरशः पाण्यात बुडाली आहेत.
काही ठिकाणी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी शिरले. घनसावंगी तालुक्यातील बोडखा, मांदळा, तीर्थपुरी, लिबोणी, वडीरामगाव, शिंदे वडगाव, मच्छिंद्रनाथ चिचोंली, ढाकेफळ, राजेगाव, बाणेगाव, मगुजळगाव, भणंग जळगाव, खालापुरी, भायगव्हाण, दहीगव्हाण, वोलेगाव, बोररांजणी, भोगगाव, पारडगाव, भेंडाळा, शेवगळ, कंडारी, अवलगाव, राजा टाकळी, जीरडगाव, बोधलापुरी, गुरू पिंपरी, भुतेगावसह इतर गावांमध्ये जोरदार पाऊस पडला.
घनसावंगी तालुक्यात यावर्षी मे महिन्यानंतर जूनमध्ये दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी ९० टक्के पेरण्या उरकल्या. मात्र नंतर पाऊसच पडला नसल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पिकांची वाढ खुंटली होती. मात्र दोन वेळा पडलेल्या मुसळधार पावसाने नदी, नाले भरभरून वाहल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे, विहिरीत तसेच कूपनलिकेत पाणी वाढले असल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.