

Twenty thousand indigenous trees nurtured in ten villages
घनसांगवी, पुढारी वृत्तसेवा अत्यल्प वनक्षेत्र असलेल्या घनसावंगी तालुक्यात दिवसेंदिवस वृक्षतोड बेसुमार पद्धतीने होत आहे. प्रकृती पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने जुलै २०२१ पासून समाज जीवन वृक्ष टीमच्या माध्यमातून घनसावंगी तालुक्यातील दहा गावात वीस हजारांपेक्षा जास्त देशी झाडांची लागवड केली. या लागवडीमुळे या भागातील उजाड, डोगराळ भाग हिर-बळीने नटला असल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीला २०२१ यावर्षी तालुक्यातील मासेगाव या ठिकाणी तळ्याचा मारुती या ठिकाणी देवराई वृक्ष प्रकल्पची उभारला २५ एकर परिसरात तळ्यातील गाळ काढून खड्डे खोदून वर्गणीतून गोळा केलेल्या पैशातून व स्वतःच्या श्रमदानातून या टीमच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्यात आली.
आज बघता बघता या ठिकाणी हजारो झाडे त्यांच्या संगोपन झाले आहे. यानंतर भेंडाळा येथील खडी आई देवी मंदिर परिसरातील टेकडीवर जिथे ७०० वृक्ष लागवड करून ओसाड उजाड असलेला परिसर आज हिरवागार झाला आहे व थंड हवेचे ठिकाण म्हणून हा परिसर ओळखला जात आहे. देवी दहेगाव रेणुका देवी मंदिर परिसराच्या बाजूला १३ एकर परिसरामध्ये १००० देशी लिंबाच्या झाडांचे रोपण करून त्याचे हे संगोपन झालेलं आहे.
डहाळेगाव येथील कानिफनाथ टेकडीवर हजारो झाडे आज बहरलेली दिसून येत आहेत. यामुळे पशु- पक्ष्यांसाठीही याचा फायदा होत आहे. ढाकेफळ येथील अहिरमलगड परिसरातही शेकडो झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करण्यात येत आहे. पिंपरखेड येथील स्मशानभूमी मध्ये ७०० रोपांची लागवड केली होती. मंगू जळगाव, देवडी हदगाव इतर ठिकाणीही वृक्ष संगोपन ही चळवळ बनली आहे.
सुरुवातीला या टीममध्ये दोन ते चार जणांनी मिळून सुरुवात केली. अनेक अडचणींचा सामना करावा लागला आज शेकडो हात सरसावले आहेत आणि बघता बघता शेकडो एकर ओसाड, उजाड, माथेरानवर शेकडो एकर आज २० हजारांपेक्षा जास्त वड, पिंपळ, लिंब, कदंब, चिंच, सहित विविध देशी प्रजार्तीच्या वृक्षांची लागवड व संगोपन झालेले आहे. आज या टीम मध्ये शेकडो नागरिक पर्यावरणप्रेमी, शेतकरी, विविध संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व्यापारी व विविध स्तरातील नागरिक या टीममध्ये सहभागी झाले आहेत. आठवड्याच्या दर शनिवारी त्या डोंगर व ठिकाणी जाऊन दिवसभर श्रमदान करतात.