Heavy Rain Cultivation work halted; Cotton-soybean soaking affects quality
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे गणित विस्कटले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे जखम अद्याप भरून न येताच मागील दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी वर्ग पुन्हा एकदा नैराश्येत ढकलला गेला आहे.
नुकतेच वेचणीस आलेले कापूस काढणीला आलेल्या सोयाबीन भिजल्याने त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारातील दर आणखी घसरण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. आधीच कमी भावांचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या हातचे पीक आता अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी संतप्त आहेत.
मांदाळा, चिंचोली, बोलेगाव, ढाकेफळ, बोडखा बु., बहिरेगाव, गुरुपिंप्री, गोठेवाडी, जामगाव, वडगाव, खडकी आदी भागात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. परिणामी तूर, हरभरा आणि गहू या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसामुळे शेतातील मशागतीची कामे ठप्प झाली आहेत, अनेक शेतकरी जमिनी मशागतीसाठी तयार करून ठेवले होते, परंतु ओलाव्यामुळे आता ही कामे पुढे ढकलावी लागणार आहेत. त्यामुळे रब्बी पेरणी किमान महिनाभर उशिरा सुरू होईल, असे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. "दरवेळी पोक तयार होतानाच पावसाचा तडाखा बसतो; वर्षभर कष्ट करून घेतलेले पीक हातात येण्याआधीच वाहून जाते," अशी व्यथा स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.